ना. प्रतापराव जाधवांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत योग - साधना! दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन ठरला जिल्हावासीयांसाठी यादगार ..
Jun 21, 2024, 18:32 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारत देशाचे नाक, तोंड आणि डोळे असलेल्या तथा अनुपम सौंदर्याने नटलेल्या जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे शुक्रवारी जागतिक योगदिनाचा अभूतपूर्व सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत मातृतीर्थ जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग दिन कार्यक्रमात सहभाग नोंदवून योग साधना केली. योगासनाची विविध प्रात्यक्षिके सादर करण्याचा केंद्रीयमंत्र्यांच्या रुपातील मान ना. जाधव यांना पहिल्यांदाच मिळाला अन् तोही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत.. लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांना जिल्ह्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले. संसदेत पुन्हा नेतृत्व करण्याची संधी दिल्याने जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यातच आयुष्य आणि आरोग्य मंत्रालयाची धुरा सोपविल्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात त्यांना मोठ्या आदराने सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत नामदार प्रतापराव जाधव यांना योग साधना करता आल्याने आजचा आंतरराष्ट्रीय योगदिन बुलडाणा जिल्हावासीयांसाठी अविस्मरणीय असा ठरला.
केंद्रीय मंत्री पदाची सूत्रे हाती आली आणि योगायोगाने योगदिनही जुळून आला. या पार्श्वभूमीवर ना. प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी योगदिनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ठिकठिकाणच्या योगदिन कार्यक्रमात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले.
निरोगी आयुष्यासाठी योगावर भर द्या
योग साधना ही आयुर्मान वाढविणारी आणि निरोगी आयुष्याची शिदोरी देणारी असल्याने प्रत्येक नागरिकांनी योग प्राणायाम केलेच पाहिजे, असे आवाहन करतानाच निरामय निरोगी आयुष्यासाठी योग, प्राणायाम एक वरदानच आहे, असा संदेश प्रतापराव जाधव यांनी आज योगदिनी देशवासियांना दिला.
जिल्हावासीयांनी याची डोळा पाहिला अभूतपूर्व सोहळा...
जागतिक योगदिनाचा मुख्यसोहळा जम्मू काश्मीर मध्ये पार पडला. या सोहळ्याच्या संयोजनात महत्वाची भूमिका निभावणारे जिल्ह्याचे भूमीपुत्र तथा केंद्रीय राज्य मंत्री या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झळकले. जिल्ह्याचा सन्मान वाढविणारा हा अभूतपूर्व सोहळा लाखो जिल्हावासीयांनी याची देही, याची डोळा पाहिला. जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना यंदा मोठा बहुमान लाभल्याने दूरवरच्या बुलडाणा जिल्ह्यातही जागतिक योग दिन यंदा उत्साहात साजरा करण्यात आला....