ना. प्रतापराव जाधवांवर आणखी नवी जबाबदारी !
Jul 4, 2024, 20:10 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सलग चौथ्यांदा विक्रमी विजय मिळवल्यानंतर बुलढाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ समितीची पुनर्रचना केली असून गुंतवणूक वाढीवरील कॅबिनेट समितीवर ना. प्रतापराव जाधवांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे, जिल्ह्याचे भूमिपुत्र ना. जाधव यांचा आता देशाच्या आर्थिक विकासातही सहभाग असणार आहे.
३ जुलै रोजी देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळ समित्यांची पुनर्रचना करण्यात आली. या बैठकीत ना. प्रतापराव जाधव यांना सुद्धा निमंत्रित केल्या गेले. गुंतवणूक आणि वाढीव कॅबिनेट मंत्रिमंडळ समितीवर ना. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही नियुक्ती केली आहे. ही समिती निर्धारित काल मर्यादेत जलद गतीने अंमलबजावणी करण्यासाठी आणि आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची ओळख करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. ही गुंतवणूक समिती देशातील सर्व क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीवर देखरेख करते, त्यानंतर वेगवान प्रगती सुनिश्चित करते, केंद्रीय स्तरावरील सरकारी धोरणे तयार करण्यासाठी प्राथमिक संस्थेच्या रूपाने ही समिती काम पाहते. तसेच राष्ट्रीय विकास उपक्रमांना पुढे नेण्यासाठी प्रभावी समन्वय घडून आणण्याचे काम या समितीवर असते. अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या समितीवर ना. प्रतापराव जाधव यांची नियुक्ती झाल्याने ना. जाधव यांची पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असलेली जवळीक बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी पूरक ठरणार आहे.