Amazon Ad

पक्षीय उमेदवार ठरेना; अपक्षांची धूम! बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील अनोखे चित्र

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्यातील इतर मतदारसंघांत पक्षांचे उमेदवार ठरल्यात जमा असून, त्यांनी जोरदार प्रचार चालविला आहे. सभा, भाषणबाजी, वादग्रस्त विधाने, भूमिपूजन, उद्घाटन सोहळ्यांना ऊत आला आहे. या तुलनेत बुलडाणा लोकसभा मतदारसंघात मात्र पक्ष किंबहुना महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवारच ठरले नसल्याने पक्षीय पातळीवर शांत आणि "थंडा थंडा कुल कुल' असे मजेदार वातावरण आहे. या तुलनेत दोन अपक्ष उमेदवारांनी मात्र मतदारसंघात झंझावाती प्रचाराची धामधूम चालवली आहे. त्यांनी प्रस्थापित पक्षांच्या संभाव्य उमेदवारांना आताच पिछाडीवर टाकल्याचे चित्र आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्या, प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलन करणारे आक्रमक शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि अविकसित बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी धडपडणारे, विकासाचे व्हिजन जिल्हावासीयांसमोर मांडणारे शांत संयमी युवा नेते संदीप शेळके यांचा समावेश आहे.

सदैव आंदोलनात व्यस्त, शेतकरी चळवळ हाच ध्यास व श्वास असणारे रविकांत तुपकर यांच्या पाठिशी लाखो शेतकऱ्यांची आशीर्वादरूपी ताकद आहे.आता त्यात शहरी नागरिक, विद्यार्थी, कामगार यांचीही भर पडली आहे, तर संदीप शेळके यांना प्रबळ शाहू परिवार आणि अन्य संस्थांचे पाठबळ आहे. मात्र त्यांनी जेव्हापासून वन बुलडाणा मिशनच्या माध्यमाने जिल्ह्याच्या अविकसितपणा, मागासलेपण, त्यासाठी जबाबदार सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते यांच्याविरुद्ध आवाज बुलंद केला, तेव्हापासून ते व्यापक झाले. एक मोठी दृश्य-अदृश्य विकासप्रेमी नागरिकांची फौज त्यांच्या पाठिशी उभी राहिली आहे. यामुळे वर्षभरात ते "उद्याचे नेते ' म्हणून उदयास आले आहे. जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक संवाद मेळावे घेतले.

२२ जानेवारीला श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संतनगरी शेगाव ही श्रीराम वंदना यात्रा देखील चांगलीच गाजली. त्यानंतर ३ फेब्रुवारीला बुलडाण्यात झालेल्या बूथ कमिटी सदस्यांच्यामेळाव्यातच मायबाप जनतेने संधी दिल्यास खासदार म्हणून नव्हे तर लोकसेवक म्हणून काम करणार असल्याचे सांगितले.
१० फेब्रुवारीपासून संदीप शेळकेंची संपूर्ण बुलडाणा लोकसभा क्षेत्राला व्यापणारी परिवर्तन रथयात्रा सुरू झाली. तब्बल ५० दिवस ही यात्रा चालणार असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांत जाण्याचे नियोजन आहे. परिवर्तन यात्रेदरम्यान गावोगावी जाऊन संदीप शेळके आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तनाची साद
घालत आहेत. शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, शेतमजूर, उद्योजक, बुद्धिजीवी, वकील, डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर यांच्या भेटी गाठी आणि विविध बैठका देखील घेत आहे.
रविकांत तुपकरांचा एल्गार...
दुसरीकडे मागील अनेक महिन्यांपासून सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल्गार आंदोलन करून तुपकरांनी
सरकारला भंडावून सोडले. जलसमाधी असो की मंत्रालय ताब्यात घेण्याचे आंदोलन असो, त्यांचे प्रत्येक आंदोलन यशस्वी ठरले. आता लोकसभा लढण्याचा त्यांचा पक्का निर्धार झाल्याने त्यांनी एल्गार, कार्यकर्ता मेळाव्यांचा जिल्ह्यात धडाका लावला आहे. या मेळाव्यांना संपुर्ण बुलडाणा लोकसभा मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एक वोट, एक नोट या धर्तीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय बोलून दाखविताच प्रत्येक मेळाव्यात त्यांच्यासाठी निधी जमा होत आहे. ही त्यांच्या प्रचाराचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे. रात्रीचा दिवस करून स्वबळावर सुरू असलेले तुपकरांची आंदोलने लक्षवेधी ठरली. त्याचप्रमाणे त्यांचा झंझावाती प्रचार देखील लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.