बॅनर, पोस्टर, जाहीरातबाजी, फटाके काहीच नको! वाढदिवसाला कोणताही वायफळ खर्च न करण्याचे रविकांत तुपकर यांचे आवाहन

 
हबन
बुलडाणा( बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) :वाढदिवस हा एखाद्या उत्सवासारखा साजरा करुन विनाकारण उधळपट्टी करण्याची सध्या प्रथाच पडली आहे. परंतु मी कधीच माझा वाढदिवस साजरा करत नाही. त्यामुळे माझ्या सर्व चाहत्यांनी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही वायफळ खर्च करु नये, असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे. बॅनर, पोस्टर, जाहीरातबाजी, फटाके किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा ईव्हेंट करु नये, अशी विनंती रविकांत तुपकर यांनी केली आहे.
 शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा १३ मे रोजी वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करणे त्यांना पटत नाही, गेल्या २२ वर्षांपासून चळवळीत काम करत असतांना सर्वसामान्य जनता, तरुण, महिला व समाजातील सर्वच घटकांसाठी रविकांत तुपकरांनी लढा दिला आहे. बुलढाणा जिल्हाच नव्हे तर राज्यभरात रविकांत तुपकरांचे चाहते, हितचिंतक आणि जिवाभावाचे कार्यकर्ते व मित्रपरिवार आहे. परंतु असे असले तरी आजवर त्यांनी कधीच आपला वाढदिवस थाटामाटात साजरा केला नाही. पूर्वी वाढदिवसाच्या दिवशी ते अज्ञातवासात असायचे परंतु हितचिंतक, कार्यकर्ते नाराज होतात म्हणून काही वर्षांपासून ते आपल्या बुलढाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे उपस्थित राहून सर्वांच्या शुभेच्छा स्विकारतात, थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेतात त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस पार पडतो. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता, तरुण आणि मायमाऊल्यांचा आशिवार्द, प्रेम हीच आपली खरी संपती आणि ताकद आहे. बुलडाणा लोकासभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा या प्रेमाची प्रचिती आली. जनतेच्या प्रेमातून उतराई होणे शक्य नाही, त्यामुळे हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवत त्यांच्या भेटीसाठी आणि सर्वसामान्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपण स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर,बुलढाणा येथे उपस्थित राहणार आहोत. परंतु कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार यांनी बॅनर, पोस्टर, जाहीरातबाजी, फटाके किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा वायफळ खर्च करु नये, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.