खासदार जाधवांच्या बालेकिल्ल्यात आज नितीन बानगुडे पाटलांची तोफ धडाडणार! दुपारी सिंदखेडराजा, सायंकाळी राजेगाव व रात्री डोणगावात होणार जाहीर सभा; "होऊ द्या चर्चा"

अभियानाअंतर्गत सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा होणार भांडाफोड! जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर म्हणाले, गद्दारांच्या पायाखालची वाळू सरकली...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे "होऊ द्या चर्चा" या अभियानाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ, फर्डे वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील या अभियानासाठी आज,४ ऑक्टोबर आणि उद्या ५ ऑक्टोबरला जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. केंद्र आणि गद्दारी करून स्थापण झालेल्या राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड नीतीन बानुगडे पाटील करणार आहेत. आज,४ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता सिंदखेडराजा येथील सावता भवनात जाहीर सभा होणार आहे, सायंकाळी ५ वाजता लोणार तालुक्यातील राजेगाव तर रात्री ८ वाजता डोणगावात होणाऱ्या जाहीर सभेला प्रा. नितीन बानगुडे पाटील संबोधित करणार आहेत, अशी माहिती देत या सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्घव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केले आहे.

Bfbfn

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना बोलघेवड्या आहेत. जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पैसे नाहीत. आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पैसे नाहीत. गृहखात्याच्या पुरता बोजवारा उडाला आहे, कुणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही. महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात घाटावर पुरेसा पाऊस नाही. वेळेवर पाऊस न पडल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. मुख्यमंत्री "शासन आपल्या दारी" अभीयानासाठी जिल्ह्यात येऊन गेले पण दुष्काळावर त्यांनी चकार शब्द काढला नाही. गद्दारी करून सत्तेची फळे चाखणाऱ्या जिल्ह्यातल्या खासदार ,आमदारांना जिल्ह्यातल्या प्रश्नांशी देणेघेणे नाही, कारण आता थोडेच दिवस उरले आहेत असेही नरेंद्र खेडेकर "बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना म्हणाले. होऊ द्या चर्चा या अभियानाच्या यशस्वीतेमुळे जिल्ह्यातल्या गद्दार नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असेही खेडेकर म्हणाले. होऊ द्या चर्चा या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नरेंद्र खेडेकर यांनी केले.