मेहकर तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेचा झंझावात; शेतकरी कष्टकऱ्यांचा आवाज झाला बुलंद! रविकांत तुपकर म्हणाले, परिवर्तनाचा लढा आता जनतेनेच हाती घेतला

 
मेहकर
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात आता सर्वदूर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. हा लढा आता माझ्या एकट्याचा राहिला नसून शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेने हा लढा हाती घेतला आहे आणि एकदा का जनतेने ठरविले की मग कोणतीही ताकद ते रोखू शकत नाही, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मेहकर तालुक्यात बोलतांना केले. निर्धार परिवर्तन यात्रेला मेहकर तालुक्यात अत्यंत उत्साही प्रतिसाद मिळाला. संपूर्ण तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेचा धुमधडाका पाहायला मिळाला. शेतकरीपुत्राचा हा माहोल परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला.
  रविकांत तुपकर यांची निर्धार यात्रा मजल दरमजल करत ११ मार्च रोजी मेहकर तालुक्यात पोहोचली. तालुक्यातील छत्रपती शिवाजी नगर, पेनटाकळी, कळंबेश्वर, कासारखेड, सारशिव, हिवरा खुर्द, ब्रम्हपुरी, नांद्रा धांडे, कल्याणा, कंबरखेड, साब्रा, आंधृड, अंजनी बु. सोनाटी या गावांचा दौरा करून येथील नागरिकांशी रविकांत तुपकरांनी संवाद साधला. येथील सभांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे मोठा प्रतिसाद दिला. सगळीकडे लोकांचा परिवर्तनासाठीचा असलेला उत्साह उर्जादायी आहे. या बळावरच आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी यावेळी बोलतांना केले. वैयक्तिक रविकांत तुपकर यांना लोकसभेत पाठवणे हा उद्देश नसून महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, तरुणांचा व सर्वसामान्यांचा आवाज लोकसभेत पोहचविण्यासाठी जिल्हाभरातील सर्व सामान्य जनता आता तन-मन-धनाने कामाला लागले आहे. मला कोणी गॉडफादर नाही, माझ्या पाठीमागे कोण्या राजकीय नेत्याची ताकद नाही, संपत्ती नाही, परंतु शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनता हीच माझी गॉडफादर आणि सर्वसामान्यांचे मिळत असलेले प्रचंड प्रेम व आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती आहे. आणि ही संपत्ती पाहता जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत असल्याचा मला अभिमान वाटतो. आयुष्यात कधीच साहेब, दादा, भाऊ होणार नाही, मी तुमच्या सर्व सामान्यांचा रविकांत म्हणूनच कायम राहील. परिवर्तनाची लढाई आता सर्वसामान्यांनी आपल्या हातात घेतली आहे, जिल्हाभर परिवर्तनाचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. त्यामुळे आता यावेळी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रयत्न आणि परिश्रमाला निश्चितच यश येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.`जे करी गाव ते न करी राव´ त्याप्रमाणे आता एक नव्हे तर जिल्ह्यातील गावेच्या गावे परिवर्तनाचा निर्धार करून ठाम आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही अफवा पसरविल्या आणि काहीही कांगावा केला. तरी आता परिवर्तन निश्चितच आहे, असा विश्वास देखील रविकांत तुपकरांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
           यावेळी गणेश गारोळे, सहदेव लाड, कैलास उतपुरे, प्रफुल्ल देशमुख, महेश देशमुख, अनिल बोरकर, देवेंद्र आखाडे, सिद्धू बोरे, शिवाजी ढवळे, गोपाल सुरडकर, अरविंद दांदडे, ज्ञानेश्वर दांदडे, संदीप नालिंदे, राम अंभोरे, गणेश कष्टे, बाळू देवकर, गजानन म्हस्के, हनुमान वडतकर, राजेश दुनगु, सहदेव काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.