खामगाव तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेचा झंझावात ; तुपकरांच्या सभांना गर्दी! रविकांत तुपकरांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत
Mar 1, 2024, 19:35 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. खामगाव तालुक्यातही २९ फेब्रुवारी रोजी निर्धार परिवर्तन यात्रेचा झंझावात पहावयास मिळाला. नागरिकांनी रविकांत तुपकरांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत व सत्कार करून त्यांना आपले समर्थन दर्शविले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला मिळत असलेला हा प्रतिसाद जिल्ह्यातील पुढील राजकीय भविष्य वर्तवणारा ठरत आहे.
जाहिरात 👆
निर्धार परिवर्तन यात्रेच्या आठव्या दिवशी खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी, कारेगाव (हिंगणा), हिंगणा कारेगाव, चितोडा अंबिकापुर, कोलरी, उमरा लासुरा, हिंगणा उमरा, संभापूर, पळशी खु., पळशी बु., कदमापूर, लोणी, दस्तापुर, शहापूर या गावांचा झंझावाती दौरा रविकांत तुपकर यांनी केला. यात्रेदरम्यान ठिक-ठिकाणी नागरिकांनी तुपकरांचे मोठ्या प्रेमाने व जोरदार स्वागत केले. यावेळी शेतकरी कष्टकरी तरुण व सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांबद्दल रविकांत तुपकर यांनी आत्मियतेने संवाद साधला. त्यानंतर पळशी बु.,कदमापूर व शहापूर येथील सभांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. जनतेचे आशीर्वाद आणि त्यांचे समर्थन हाच आपला सगळ्यात मोठा खजिना आहे. २१ वर्ष शेतकरी, कष्टकरी,शेतमजूर, तरुण व सर्वसामान्यांसाठी केलेल्या कामाची पावती आज नागरिकांमधून मिळणाऱ्या समर्थनाच्या रूपाने दिसून येत आहे. परिवर्तनाच्या दिशेने गावकरी मला देत असलेला पाठिंबा अमूल्य आहे,असे भावनिक उद्गार यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी काढले.
घाटाखालील चारही तालुक्यात मोठे समर्थन
गेल्या आठ दिवसांपासून रविकांत तुपकर यांचे निर्धार परिवर्तन यात्रा घाटाखाली सुरू आहे. खामगाव, शेगाव, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या चारही तालुक्यांमध्ये यात्रेला लोकांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. विशेषकरून तरुणांचा रविकांत तुपकर यांना जोरदार पाठिंबा मिळतांना दिसला. एकंदरीत घाटाखालील चारही तालुक्यांमध्ये रविकांत तुपकरांच्या सभेला लोकांची गर्दी पाहायला मिळाल्याने तुपकरांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे.