दुसरबीड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सौ.सरस्वती मखमले! ग्रामपंचायत सरपंचपदाची अखेर निवडणूक झाली

 
kdd
 सिदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):     मागील चाळीस दिवसांपासून सरपंच व उपसरपंचपदासाठीच्या  निवडणुकीभोवती दुसरबीड येथील राजकीय वातावरण तापले होते. बहुमतात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १३ सदस्यांमध्ये दोन गट पडल्याने काल, १ नोव्हेंबरच्या दुपारी सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी दोघांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहा विरूद्ध सात असे मतदान झाले. दरम्यान सौ.लक्ष्मी कृष्णा जऱ्हाड यांना सात तर सौ.सरस्वती शरदराव मखमले यांना दहा मते मिळाली. यामुळे सौ.सरस्वती शरदराव मखमले यांना सरपंच म्हणून घोषित करण्यात आले.
 

pood

दि. २२ सप्टेंबर पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे १३ सदस्य दोन वेगवेगळ्या गटांत विभागले गेले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख व पं.स.चे माजी सभापती विलासराव देशमुख यांचा एक गट तर जिल्हा परिषद सदस्य पंडितराव खंदारे यांचा एक गट तयार झाला होता. तर दोन्ही गटात सरपंच व उपसरपंच पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून कलह सुरू होता. आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मध्यस्थीने अखेर राजीनामा नाट्य संपविण्यात आले. दि.२५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली काल ,दि.१ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सरपंचपदासाठी विशेष सभा बोलावून अर्ज मागविण्यात आले होते. 

 त्यानंतर दुसरबीड सरपंच निवडणूक  अधिकारी म्हणून एस.एस.साळवे यांनी सभेपूर्वी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास वेळ दिला होता. या कालावधीमध्ये सौ.लक्ष्मी कृष्णा जऱ्हाड व सौ.सरस्वती शरदराव मखमले यांचे दोन अर्ज प्राप्त झाले होते. दुपारी २ वाजता कोरम पुर्ण असल्याने सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी साळवे यांनी नामनिर्देशन पत्राची छाननी करून सौ. लक्ष्मी कृष्णा जऱ्हाड व सौ.सरस्वती शरदराव मखमले यांचे दोन्ही अर्ज वैध असल्याचे सांगितले. त्यामुळे निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जाहीर करत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला. परंतू कोणीही अर्ज मागे न घेतल्याने सरपंच पदाच्या निवडीसाठी दोन अंतिम उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर मतदान घेण्याकरता हात वर करून मतदान घेण्यासाठी विचारणा केली असता लक्ष्मी जऱ्हाड यांनी लेखी अर्ज सादर केल्याने गुप्त मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

दरम्यान उपस्थित १७ सदस्यांचे गुप्त मतदान घेतले असता सौ.लक्ष्मी कृष्णा जऱ्हाड यांना ०७ मते मिळाली तर सौ.सरस्वती शरदराव मखमले यांना १० मते मिळाली. त्यामुळे ग्रामपंचायत दुसरबीड सरपंच म्हणून सौ.सरस्वती शरदराव मखमले यांना घोषित करण्यात आले. यावेळी मोहीनअली शेख,अरूण मखमले, शरदराव मखमले, गजानन देशमुख, गजेंद्र देशमुख,सतीश काळे, सिताराम चौधरी, वैभव देशमुख, तलाठी राहुल देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.