बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबत! आमदार डॉ.शिंगणे, जिल्हाध्यक्ष काझी, प्रसेनजित पाटील, पांडुरंग पाटील, भूषण दाभाडे यांनी केली भूमिका स्पष्ट!
अजितदादांचा जिल्ह्यात फ्लॉप शो? डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, राजकारण सोडून शेती करावी वाटतेय..
Jul 2, 2023, 19:56 IST
शेगाव( ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याच्या राजकारणात आज महाभूकंप झाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी बंड करीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ८ बड्या नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान या घडामोडीमुळे एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात मात्र अजित दादांची जादू चालत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बहुतांश नेते शरद पवार यांच्यासोबत आहेत. नेत्यांनी तशी भूमिका देखील स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा डॉ. राजेंद्र शिंगणे संध्या कुटुंबीयांसोबत बाहेरगावी आहेत. एका दैनिकाचा त्यांच्याशी संवाद झाला. त्यावेळी काय घडतय त्याची आपल्याला कल्पना नाही. सध्याचे राजकारण पाहून राजकारण सोडून शेती करायची इच्छा होत असल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काझी यांनीसुद्धा आपण व सर्व कार्यकर्ते मोठ्या साहेबांसोबत( शरद पवार) असल्याचे स्पष्ट केले. दीड वर्षाआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे जळगाव जामोदचे नेते प्रसेनजीत पाटील यांनीसुद्धा बुलडाणा लाइव्ह शी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार आहे, मी परिवारासोबत आहे. सध्या परिवारावर मोठा आघात झाला आहे. राजकारणाचा स्थर घसरलेला आहे. अजित पवारांनी जे केलं ते कल्पनेच्या बाहेरच आहे असं प्रसेनजीत पाटील म्हणाले.
सहकार नेते पांडुरंग पाटील यांनीसुद्धा शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.जिल्ह्याचे नेते शिंगणे साहेब मोठ्या साहेबांसोबत आहेत, आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत. शिंगणे साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे पांडुरंग पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे यांनी देखील शरद पवार आणि आमदार डॉ.शिंगणे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. राजकारणाचा स्थर घरसला आहे, सामान्य कार्यकर्त्यांची गोची होत आहे. मी व विद्यार्थी आघाडीची संपूर्ण टीम मोठ्या साहेबांसोबत तसेच शिंगणे साहेबांसोबत असल्याचे ते म्हणाले.