बुलडाण्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे ; लोकसभेच्या नव्या समीकरणाची नांदी! वाचा ज्येष्ठ पत्रकार विजय देशमुख यांचा बुलडाण्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरील विशेष लेख....
बुलढाणा(विजय देशमुख) : बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीचे(अजित पवार गट)मातब्बर मंत्री दिलीप वळसे पाटील यांची काल झालेली नियुक्ती ही आगामी लोकसभा निवडणूकीतील उमेदवारीच्या नव्या समिकरणाची नांदी असल्याचे दिसत आहे.पाणीपुरवठा मंत्री शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांच्याकडे आतापर्यंत बुलढाण्याचे पालकमंत्रीपद होते.शेजारच्या जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या गुलाबरावांनी अपवादानेच जिल्ह्यात हजेरी लावली.त्यांची पालकमंत्रीपदाची कारकिर्द(?)अशी राहिली की,जिल्हावासियांना पालकमंत्र्यांचे नावही सहजासहजी आठवत नव्हते.तात्पर्य,पालकमंत्रीपदाला गुलाबरावांनी न्याय दिला नाही.आता मात्र दिलीप वळसे पाटलांच्या रूपाने बुलढाण्याला अभ्यासू व दिग्गज पालकमंत्री देऊन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने लोकसभा उमेदवारीच्या अनुषंगाने दमदार पाऊल टाकले आहे.
शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीकडे जाऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. गायकवाडांची मुख्यमंत्र्यांशी असलेली सलगी पाहता पालकमंत्रीपदाचा विषय ते प्रतिष्ठेचा करतील असे अनेकांना वाटत होते पण तसे झाले नाही.शिंदे गटाच्याच आधीच्या पालकमंत्र्यांची(गुलाबरावांची) निष्क्रियता नजरेसमोर होतीच.यामुळे अजित पवारांनाही बुलढाण्याचे पालकमंत्रीपद आपल्या गटाकडे खेचून घेणे सुकर झाले. चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीकडे(डॉ .राजेंद्र शिंगणे)जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असतांना विकास निधीच्या वाटपात दुजाभाव केल्याबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदार-खासदारांची उघड-उघड तक्रार होती.तोच धागा पकडून आ.गायकवाडांनी राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद देण्यास विरोध केला.पण त्यांचा एकट्याचा रेटा कमजोर ठरला. शिंदे गटाचे खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमूलकर विरोधासाठी त्वेषाने समोर का आले नाहीत?हा एक प्रश्नच आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवल्याचा थेट धक्का हा खा..जाधवांनाच अधिक जाणवला असणार.पालकमंत्र्यांच्या हातात निधी वाटपाची आणि प्रशासन हाताळण्याची चावी असते. येत्या निवडणूकांआधी राष्ट्रवादीला अनुकूल अशा वातावरण निर्मितीची जबाबदारी पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून आपसूकच दिलीप वळसे पाटलांवर आहे. राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा उमेदवारीची दूरदृष्टीची मांडणी अजित पवारांनी केली आहे. जिल्ह्यात तीन आमदार असलेल्या भाजपाला आणि एक खासदार व दोन आमदार असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाला अवाक करणारी चाल अजित पवारांकडून खेळली जात आहे.भविष्यात भाजपा-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गट अशी मोट बांधली जाऊन लोकसभा-विधानसभा निवडणूका लढवल्या जातील असे चित्र आजघडीला तरी स्पष्ट दिसत आहे.या तीन पक्षांच्या आघाडीत असलेल्या अजित पवार गटाला राज्यात लोकसभेसाठी अनुकूल वाटणाऱ्या निवडक मतदारसंघांमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा प्रकर्षाने नजरेसमोर ठेवला गेला आहे.वळसे पाटलांच्या नियुक्तीने याला पुष्टी मिळत आहे.अगदी कालपर्यंत भविष्यात बुलढाणा लोकसभेची उमेदवारी भाजपा की ,शिंदे गट ? कुणाच्या वाट्याला जाईल? आणि कोण कोण असतील उमेदवार ?याविषयी आडाखे बांधले जात असतांना नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची राजकीय चर्चेत अशी अकस्मात 'एन्ट्री' झाली आहे.बुलढाणा लोकसभा मतदार संघात २००९ पासून राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात लढत होत आली आहे.
आगामी निवडणूकीत हा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची पुसटशीही शक्यता असती तर निवडणूकपूर्व काळात महत्वाचे असलेले पालकमंत्रीपद मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादीकडे जाऊ दिलेच नसते. चौथ्या वेळीही लोकसभा उमेदवारीची आशा बाळगलेल्या खा.प्रतापराव जाधवांसाठी ही धोक्याची घंटा आहे.भाजपाकडे हा मतदारसंघ अलिकडच्या काळात कधीही नव्हता.अजित पवार 'राजकिय दादागिरी'करून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ मिळवतील असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.त्यांच्या पक्षाचे संभाव्य उमेदवार आ.डा.राजेंद्र शिंगणे हे असू शकतात.नवे समिकरण आकाराला येऊ पहात आहे.नव्या पालकमंत्र्यांनी नियुक्तीच्या काही तासांतच जिल्ह्यात येऊन प्रशासन कामाला लावले आणि पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना उर्जा दिली. त्यांची ही कार्यगती पाहता अन्य पक्षीयांनाही सजग व्हावे लागेल!