Amazon Ad

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान आणि प्रतापराव जाधव पुन्हा खासदार होणार! केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे प्रतिपादन!

म्हणाले, मोदींनी गरिबीचे चटके सोसले, त्यांना गरिबांची जान; धाड येथे पार पडली खा.जाधव यांच्या प्रचारार्थ प्रचारसभा..
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला लागणार आहेत, मात्र त्याआधीच संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला सुद्धा विश्वास आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत. कारण जुलै महिन्यातील विदेश दौऱ्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आताच मिळाले आहे. अबकी पार ४०० पार होणार आणि प्रतापराव जाधव हे पुन्हा एकदा खासदार होणार असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. काल, २२ एप्रिलला धाड येथे महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली, यावेळी सभेला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर सिनेअभिनेता गोविंदा, ना.अब्दुल सत्तार, आ. श्वेताताई महाले , आ.संजय गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
  Advt
Advt.👆
पुढे बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले की, ३५ वर्ष झाली मी आमदार - खासदार आहे. आत्तापर्यंत भरपूर अर्थसंकल्प मी पाहिले आहेत. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला परंतु २०४७ साली भारत देशाचा अर्थसंकल्प कसा असेल, संपूर्ण जगभरात भारत देशाचा विकास कसा झालेला असेल याची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात झालेली आहे. यामुळे एवढी दूरदृष्टी असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाला मिळाला असल्याचे ना.दानवे म्हणाले. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासोबत मी २०१४ साली जेव्हा संसदेत उभा होतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीनी पहिल्या भाषणात सांगितले की, हे सरकार शेतकऱ्यांचे, गोरगरीब जनतेचे आहे. देशामधला सर्वाधिक हिस्सा देशातील गोरगरिबांसाठी देणार असल्याचे मोदींनी सांगितले होते. गरिबांप्रति अत्यंत संवेदनशील पंतप्रधान म्हणून मोदींची ओळख असल्याचे ना.दानवे म्हणाले. लहानपणी पंतप्रधान मोदींनी चहाच्या दुकानावर काम केलं त्यामुळे गरिबीचे चटके त्यांनी सोसले आहेत. त्यामुळे त्यांनी गरीब जनतेचा अजेंडा बनवला आणि गरिबांना इतरांबरोबर चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी संकल्पना केली. तशा पद्धतीच्या योजना कार्यान्वित केल्या. जेव्हा देशात पहिल्यांदा कोविडचा शिरकाव झाला त्यावेळी बाहेर देशातील सुविधा आपल्या देशात आणून सगळ्यात मोठे सुरक्षिततेचे पाऊल त्यांनी उचलले, बाहेर देशातील सुविधा भारत देशात उपलब्ध केल्या. बाहेर देशातून ऑक्सिजन, पीईपी किट, औषधी पंतप्रधानांनी उपलब्ध करून दिली असे ना.दानवे म्हणाले.
  २०११ च्या जणगणने नुसार १२५ कोटी लोकसंख्या या देशात आहे त्यापैकी ८० कोटी गरीब जनता आहे. या गरीब जनतेला मोफत धान्य पुरवण्याचे काम मोदींच्या संकल्पनेतून या सरकारने केले आहे. मनमोहन सिंग ज्यावेळी पंतप्रधान होते तेव्हा देशाची प्रतिमा खराब झालेली होती, कोणी त्यांना विमानतळावर घ्यायला जायचे नाही कारण हा देश गरीब आहे, यांचे सरकार स्थिर नाही, अशी भावना इतर देशातील लोकांची होती. परंतु जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी -२० परिषदेचे अध्यक्ष झाले, दिल्ली येथे झालेल्या समारोपीय कार्यक्रमात पावणे दोनशे देशाच्या प्रतिनिधींनी भारताचे कौतुक केले. २०१४ नंतर भारत देश बदलला आहे असे ना.दानवे म्हणाले. खा.प्रतापराव जाधव यांचे काम मी जवळून पाहिले आहे, संसदेत अनुभव कामाला येतो त्यामुळे पुन्हा एकदा प्रतापराव जाधव यांना विजयी करण्याचे आवाहनही ना.दानवे यांनी केले.