Amazon Ad

नरेंद्र खेडेकरांच्या कार्यालयाकडून निष्ठावंत शिवसैनिकांना ४ जूनच्या तयारीला लागण्याच्या सूचना! विजयाचा विश्वास, गुलाल आपलाच; सोशल मीडियावर फिरतोय मॅसेज...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख आता जवळ आली आहे.५ दिवसानंतर ४ जूनची तारीख उजाडणार आहे. या दिवसाची सबंध भारतासह बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील सामान्य जनतेला देखील प्रतीक्षा लागलेली आहे. मतमोजणीचा दिवस जसजसा जवळ येतोय तसे उमेदवारांची धाकधूक देखील वाढली आहे. बुलडाणा मतदारसंघात यंदा २१ उमेदवारांनी नशीब आजमावले, कुणाचे नशीब चांगले याचा फैसला ४ जूनला होणार आहे. दरम्यान उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. त्यांच्या कार्यालयाकडून निष्ठावंत शिवसैनिकांना ४ जूनच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. "विजय आपलाच, गुलाल आपलाच! लागा तयारीला" अशी पोस्ट नरेंद्र खेडेकर यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे.
विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणने आहे. २०१९ सारखा यंदा वंचित फॅक्टर चालला नाही. वंचित जिंकण्यासाठी नव्हे तर मते खाण्यासाठी उभी असल्याचा मॅसेज जनमानसात गेल्याने त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.अर्थात राजकीय विश्लेषक अद्याप कुणाच्याही विजयाचा दावा करायला नाहीत. त्यामुळे ४ जुनलाच बुलडाणा लोकसभेचा खासदार कोण असेल हे ठरणार आहे. असे असले तरी प्रा.नरेंद्र खेडेकर आणि त्यांचे समर्थक मात्र विजय आपलाच असल्याचे सांगत आहे. "तुम्ही गद्दारीला गाडण्यासाठी मतदान केलंय, ४ जूनला गुलाल आपलाच" अशी पोस्ट नरेंद्र खेडेकर यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आली आहे.