नरेंद्र खेडेकरांनी खासदार जाधवांवर टिका करणे म्हणजे सूर्यावर थुंककण्याचा प्रकार! बाळासाहेबांच्या शिवसेनेचे चिखली तालुका प्रमुख गजाननसिंग मोरेंचा घणाघात;

खेडेकरांना म्हणाले,"हा" इतिहास लक्षात असूद्या...
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार प्रतापराव जाधवांनी संसदेत म्हटलेली कविता म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरांनी केली होती. दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे चिखली तालुका प्रमुख गजाननसिंग मोरे यांनी नरेंद्र खेडेकरांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. नरेंद्र खेडेकरांसारख्या माणसाने खासदार प्रतापराव जाधवांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचा  घणाघात मोरे यांनी केला आहे. डोक्यावर आलेल्या सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रयत्न केल्यावर थुंकी आपल्याच तोंडावर उडते हे खेडेकरांना कळत नसावे म्हणून त्यांच्या तोंडून खा. जाधवांबद्दल असले शब्द निघत असावेत असेही मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या नरेंद्र खेडेकरांना काँग्रेसमध्ये किंमत नव्हती. तिथे त्यांना कुणीच विचारत नव्हते. खेडेकरांचे राजकीय करिअर संपण्याच्या मार्गावर असतांना खा. प्रतापराव जाधव यांनीच खेडेकरांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. खा. प्रतापराव जाधव यांनीच खेडेकर यांना राजकीय जीवनदान दिले हा इतिहास खेडेकरांनी विसरू नये असा सल्लाही गजाननसिंग मोरे यांनी दिला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात अपराजित असलेल्या खा. प्रतापराव जाधव यांना मिळणारे वाढते जनसमर्थन पाहून खेडेकरांच्या पोटात दुखत आहे. खेडेकरांनी लोकसभेचे स्वप्न पाहू नये. २०२४ च्या निवडणुकीत खेडेकर जर खा. जाधवांच्या विरोधात उभे राहले तर खेडेकरांचे डिपॉझिट जप्त होईल असा टोला मोरे यांनी लगावला आहे.