खासदार जाधवांच्या संसदेतील भाषणावर नरेंद्र खेडेकरांचा हल्लाबोल! म्हणाले, खासदारांनी म्हटलेली कविता म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन; त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं असत तर चित्र वेगळे दिसले असते..

 
Khedekar
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संसदेत महागाई याविषयावर बोलतांना "महंगाई नही साहब खर्चे बढ रहे हैं" ही कविता म्हटली होती. दरम्यान खा. जाधवांनी म्हटलेल्या या कवितेबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी हल्लाबोल केला आहे. खासदार जाधवांनी म्हटलेली कविता म्हणजे त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन आहे. ते ९० टक्के ग्रामीण, मध्यमवर्गीय, शेतकरी, शेतमजूर लोकांचे प्रतिनिधीत्व करतात की १० टक्के महानगरात राहणाऱ्या उच्चभ्रू वर्गाचे असा सवाल खेडेकरांनी केलाय. 

खासदार जाधव यांनी संसदेत म्हटलेल्या कवितेत ओटीटी,विकेंड, कॅब, गोवा मनाली टूर या शब्दांचा प्रयोग केलाय.या सर्व बाबी महानगरातील उच्चभ्रू १० टक्के लोकांनाच लागू होतात. ९० टक्के जनता महागाईने भरडल्या जात आहे. महागाई नसती तर देशातल्या ८० टक्के लोकांना २०२४ पर्यंत फुकट अन्न धान्य द्यायची काय गरज होती? कोरोना काळात रेमडीसिवीर इंजेक्शन चे दर ५ हजार रुपयांपर्यंत जात होते हे महागाई वाढल्याचे द्योतक नाही का ? असा सवालही नरेंद्र खेडेकरांनी केला आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅस चे भाव गगनाला भिडले आहेत मात्र तुर, सोयाबीन, कापसाचे भाव का कमी आहेत असा सवाल खासदारांनी संसदेत विचारायला हवा होता असेही खेडेकर यांनी म्हटले. खासदार जाधव यांनी रेबन चा गॉगल   घालून ही जे बघितले त्यावर कविता केली, त्यांनी डोळे उघडे ठेवून ९० टक्के लोकांची परिस्थिती बघितली असती तर चित्र वेगळे दिसले असते असेही ते म्हणाले. खासदार जाधव यांच्या कवितेवर खेडेकर यांनीही एक विडंबनात्मक कविता रचली असून त्यात त्यांनी खासदार जाधवांचे नाव न घेता त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केल्याचे दिसत आहे. आधीचे शेतकरी बैलांना जुंपून शेती करायचे ,आजचे शेतकरी ट्रॅक्टर वर बसून, रेबन चा गॉगल लावून, स्टार्च चे कपडे घालून शेती करतात, आजच्या आमदार आणि खासदारांच्या दारासमोर घरातील प्रत्येक सदस्यासाठी महागडी वाहने उभी आहेत अशा आशयाची कविता खेडेकरांनी हिंदीतून केली आहे. खेडेकरांच्या फेसबुक पेज वर ती अपलोड करण्यात आली आहे.