पालिका सदस्यांची "नाग दिवाळी'! नगरपंचायत सेवकांची हुकली संधी!!

लढत विधानपरिषदेची... जिल्ह्यातील ३६८ मतदार ठरणार निर्णायक
 
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येत्या १० डिसेंबरला होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत जिल्ह्यातील ३६८ मतदार निर्णायक ठरणार असल्याने रिंगणातील उमेदवारांचा  बुलडाणा जिल्ह्यावर "रोख' राहणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या लढतीनिमित्त जिल्हा परिषद, पालिका सदस्यांचे "लक्ष्मीपूजन' उशिरा होणार असल्याने त्यांची नाग दिवाळी का होईना धुमधडाक्यात साजरी होणार आहे. याउलट नगरपंचायत सदस्यांची "मोठ्ठी संधी' मात्र हुकली आहे.


राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि अकोला व वाशीमच्या तुलनेत मोठा असलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे मतदान आजवरच्या लढतीत निर्णयाकच ठरत आले आहे. यंदाची लढतही याला अपवाद नाहीये! जिल्ह्यातील सदस्य संख्या तशी ४०५ आहे. मात्र मोताळा व संग्रामपूर नगरपंचायतीची मुदत मागील २५ डिसेंबरलाच  संपल्याने त्या विसर्जित करण्यात आल्या आहेत. आता तिथे अनुक्रमे मलकापूर व जळगाव एसडीओ हे प्रशासक आहेत. यामुळे सदस्यसंख्या ३८ ने कमी झाली आहे.

याउप्परही जिल्ह्याचे ३६८ सदस्य असून ही संख्या निकाल ठरविण्यात महत्वाचा घटक आहे. प्राधान्यक्रम पध्दतीने होणाऱ्या या लढतीसाठी बुलडाणा जिल्हा परिषदेचे ५८ सदस्य आणि पंचायत समित्यांचे १३ सभापती मतदार राहतील. नियमानुसार सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असल्याने त्यांना "सुवर्णसंधी'  मिळाली आहे. याशिवाय ११ नगरपरिषदांचे २९७ नगरसेवक मतदार राहणार आहेत. यामध्ये थेट जनतेतून निवडून आलेले ११ नगराध्यक्ष, २७१ निर्वाचित नगरसेवक आणि २८ कॉप्शन मेम्बरचा समावेश आहे. पंचवार्षिकमध्ये या पालिकांतील एका सदस्य व एका स्वीकृत सदस्याचे निधन झाल्याने २ पदे रिक्त आहेत. एरवी  पालिका वर्तुळात स्वीकृत सदस्यांना फारशी किंमत नसते. पण या लढतीत त्यांना मतदानाचा अधिकार असल्याने त्यांचेही "भाव' वधारले आहेत. यामुळे ३६८ मतदारांची दिवाळी जेमतेम गेली असली तरी नाग दिवाळी मात्र जोरात साजरी होणार आहे. यानंतर दोनेक महिन्यांनी होणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी त्यांना मोठा ( च) हातभार लागणार आहे.