ना.प्रतापराव जाधवांचा मराठीबाणा.. मराठीतून घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ;
Jun 24, 2024, 15:57 IST
नवी दिल्ली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सलग चौथ्यांदा निवडून येत खा. प्रतापराव जाधव यांनी विक्रम प्रस्थापित केला. आयुष (स्वतंत्र प्रभार) व कुटुंब आरोग्य कल्याण राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. लोकसभा सदस्यपदी सलग चौथ्यांदा मराठीतून शपथ घेत ना. प्रतापराव जाधव यांनी मराठी बाणा जपला आहे. आज २४ जून रोजी, ना. जाधव यांनी मायबोली मराठीतून लोकसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली.
यंदा ही १८ वी लोकसभा असून लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनासाठी हंगामी लोकसभा सभापती म्हणून मातृहरी मेहताब यांची निवड करण्यात आली. दरम्यान, निवडून आलेल्या सर्वच लोकसभा सदस्यांनी संसद भवनात सदस्य पदाची शपथ घेतली. दरम्यान, बुलढाणा लोकसभेचे प्रतिनिधित्व करत सलग चौथ्यांदा ना. प्रतापराव जाधव यांनी मराठीतून शपथ घेतली. ना. जाधव यांचे मायबोली मराठीशी असलेले प्रेम यानिमित्ताने दिसून आले. २४ जून ते ३ जुलै या कालावधीमध्ये पहिले अधिवेशन होत आहे.