Amazon Ad

ना.प्रतापराव जाधव म्हणाले, "ते" महसूल प्रशासनाचे काम! हलगर्जी झाली असेल तर जाब विचारू! देऊळगाव घुबे मदतीच्या धनादेश प्रकरणावर स्पष्टीकरण; पिडीत कुटुंबाला स्वतः दिली रोख स्वरूपात मदत...

 
देऊळगाव घुबे( ऋषी भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव घुबे येथे १२ जून रोजी आलेल्या वादळात छतासह झोका उडून गेल्याने सई भारत साखरे या ६ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. दरम्यान १५ जूनला केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी संवेदनशीलता दाखवत नागरी सत्काराचे कार्यक्रम बाजूला ठेवून तातडीने देऊळगाव घुबे येथे जाऊन मृतक सईच्या कुटुंबाची सांत्वन भेट घेत चिखली तहसील कार्यालयाने शासनाच्या वतीने दिलेला ४ लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश साखरे कुटुंबियांना सुपूर्द केला होता. दरम्यान प्रशासनाच्या वतीने चिमुकलीचे वडील भारत साखरे यांना सध्या चेक लावू नका अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे "खात्यात पैसे नाहीत का?" असा सवाल उपस्थित करीत बुलडाणा लाइव्ह ने वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान या संदर्भात केंद्रित मंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्याशी बुलडाणा लाइव्ह ने संपर्क साधला असता "असा प्रकार सहसा होत नाही. मदतीचा धनादेश हा चिखली तहसील कार्यालयाने शासनाच्या वतीने दिला होता. त्यात पैसे आहेत की नाही? हे तपासण्याची, त्याची खातरजमा करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेची आहे. यात काही चूक झाली असेल किंवा हलगर्जी पणा झाला असेल तर अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल. पिडीत कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे निर्देश संबधित यंत्रणेला दिले आहेत. आपण स्वतः देखील रोख स्वरूपात मदत उपलब्ध करून दिल्याचे ना.प्रतापराव जाधव म्हणाले.