लाल्यासदृश रोगामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे ना.मुंडे यांचे आदेश! रविकांत तुपकरांच्या मागणीची कृषिमंत्र्यांनी घेतली दखल

 
Rt
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील प्रामुख्याने घाटाखालील तालुक्यातील कपाशी पिकावर लाल्या सदृश रोग पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची १७ जुलै रोजी भेट घेवून मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत ना. धनंजय मुंडे यांनी १९ जुलै रोजी सभागृहात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मुंबई गाठत जिल्ह्यात प्रामुख्याने घाटाखालील तालुक्यात लाल्या सदृश्य रोगामुळे झालेल्या कपाशीच्या झालेल्या नुकसानीची कैफियत त्यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या समक्ष मांडली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी तुपकरांनी केली. कृषिमंत्र्यांच्या भेटीत त्यांनी या रोगामुळे हवालदिल हजारो शेतकऱ्यांची व्यथा मांडली. मोताळा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद,मलकापूर व नांदुरा या घाटाखालील तालुक्यांमधून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. मात्र लाल्या सदृश रोग पडल्याने कपाशीची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिक जळाले आहे. मात्र दिलासा व मार्गदर्शन करण्याऐवजी कृषी विभाग शेतकऱ्यांनाच दोष देऊन मोकळा झाला आहे. त्यामुळे लाल्या सदृश्य रोगामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी रेटली होती.
        यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन अजितदादा पवार व धनंजय मुंडे यांनी तुपकरांना दिले. दरम्यान या मागणीची गंभीर दखल घेऊन ना. मुंडे यांनी सभागृहात पंचनामे करण्याची घोषणाच केली. तरी तातडीने पंचनामे संपवून लवकरात-लवकर शेतकऱ्यांना नुकसान द्यावी, अशी मागणी तुपकरांनी केली आहे.