"मेरी जान कों खतरा हैं, जल्द निर्णय लो'... मेसेज गेला अन्‌...

जामिनावर सुटका होताच तुपकर पुन्‍हा मैदानात!
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अटक आणि जामिन झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्‍हा नव्या जोशात शेतकऱ्यांसाठी लढायला ठाकले आहेत. नुकसान होऊनही शेतकऱ्यांची नावे पीक विमा कंपनीने नुकसानग्रस्तांच्या यादीत टाकली नाहीत. याबद्दल चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आवारातच तुपकरांची भेट घेतली. जामिन मिळताच तुपकरांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय गाठून पीक विमा कंपनीच्या जिल्हा व्यवस्‍थापकाला धारेवर धरून तब्बल तासभर पकडून ठेवले.

अखेर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवल्यानंतर १० दिवसांत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे लेखी आश्वासन कंपनीकडून देण्यात आले. जिल्हा कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी तसे पत्र तुपकरांना दिल्यानंतर तुपकरांनी रिलायन्सच्या मॅनेजरला सोडून दिले.

मॅनेजरने कंपनीला पाठवला तो मेसेज अन्‌...
तुपकर व कार्यकर्त्यांनी कंपनीचे जिल्हा मॅनेजर शर्मन कोडीयत्तर यांना पकडून ठेवले होते. तुपकर व कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून घाबरलेल्या मॅनेजरने "मेरी जान कों खतरा हैं, जल्द निर्णय लो' असा मेसेज वरिष्ठांना पाठवला. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर सूत्रे फिरली. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनीही कृषी आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर कंपनीने लेखी पत्र जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पाठवले. ते पत्र रविकांत तुपकरांना देण्यात आले. कंपनीने दिलेला शब्द पाळला नाही तर पुढचा मोर्चा कलेक्टर ऑफिस नाही, कृषी अधिकारी कार्यालयावर नाही तर अंबानीच्या घरावर मुंबईला जाईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.