चिखलीचे राजकारण पुन्हा मुद्द्यावरून गुद्द्यावर! आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंची फेसबुक पोस्ट! म्हणाले,श्याम वाकदकर एक विकृती, प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्ती जबाबदार!

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व समर्थकांनी  भाजपच्या श्याम वाकदकरांना आज,१७ मार्चच्या सकाळी बेदम मारहाण केली. दरम्यान या प्रकारानंतर चिखलीचे राजकारण चांगलेच पेटले असून ते मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याचे चित्र आहे. त्यातच भरीस भर म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा आहे.

 "श्याम वाकदकर एक विकृती आहे. या विकृतीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तीच जबाबदार" अशी पोस्ट राहुल बोंद्रे यांनी केली आहे. राहुल बोंद्रे यांनी या पोस्टच्या माध्यमातून भाजपच्या श्याम वाकदकरांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.
  
  नेमके काय आहे प्रकरण..!

भाजप कार्यकर्ते श्याम वाकदकर त्यांच्या मुलाला परीक्षा सेटंरवर सोडण्यासाठी चिखलीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात आले होते. त्याचवेळी तिथून जात असलेल्या राहुल बोंद्रे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाकदकर यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे, स्वतः राहुल बोंद्रे यांनीच मारहाण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत आज झालं ते थोडक्यात झालं असे म्हणत आक्रमक पवित्रा घेतला. वाकदकर यांनी आपल्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती असा आरोप करीत बोंद्रे यांनी वाकदकर यांना मारहाण केली, यात वाकदकर यांच्या कानाचा फाटल्याचे सांगण्यात येत आहे. वाकडदर यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.