युवक काँग्रेसच्या निवडणुकीत प्रचारासाठी महावितरणचे कर्मचारी?

भाजपा युवा मोर्चाचा आरोप
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा उमेदवार आहे. मुलाला अध्यक्ष बनविण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा राऊत राजकीय हितासाठी वापर करत आहेत, असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाने केला आहे. आज, ९ डिसेंबर रोजी "भाजयुमो'च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राऊत यांच्या विरोधात निदर्शने केली. नितीन राऊत यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना  देण्यात आले.

ऊर्जा मंत्रालय सध्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहे. तोडलेले कनेक्शन जोडायला महावितरणकडे पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. मात्र असे असताना राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नितीन राऊत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुलाचा प्रचार करायला सांगत आहे. यामुळे मंत्रिपद स्वीकारतेवेळी त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग होत असल्याने ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करतेवेळी भाजयुमो शहराध्यक्ष सोहम झाल्टे, आशिष व्यवहारे, नितीन बेंडवाल, हर्षल जोशी, मोहित भंडारी, सिद्धार्थ मलिक, वैभव अंभोरे, राजेश देशमुख, शुभम कोठारी, अक्षय छाजेड, संतोष बर्डे, अमोल लांडगे, अजय वानखेडे, अथर्व जोशी, शंतनू आमले, शुभम भोंडे, जीवन खांबीकटर यांच्यासह कार्यकर्ते उपस्‍थित होते.