खासदार प्रतापराव जाधवांचे राजकीय वजन वाढले! लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी..!

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांचे पक्ष संघटनेतील राजकीय वजन आता चांगलेच वाढले आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांना साथ देणाऱ्या खासदार जाधवांची शिंदेंनी नेतेपदी वर्णी लावली होती.  आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणखी एक महत्वाची जबाबदारी खासदार जाधवांवर सोपवली आहे.

 अकोला आणि बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदी खासदार जाधवांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेतेपदाची राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सांभाळत असतानांच खा.जाधवांना स्वतःच्या बुलडाणा लोकसभा व शेजारच्या अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

लोकसभा निवडणुका १२ महिन्यांवर येऊन ठेपल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयारी सुरू केली आहे. त्या तयारीचा भाग म्हणून महत्वाच्या नेत्यांना लोकसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. खा. प्रतापराव जाधव हे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. याआधी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना त्यांना राज्यमंत्रीपदाची देखील जबाबदारी सांभाळली होती. शिवसेनेत उठाव होण्याआधी खा. जाधव बुलडाणा जिल्हा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख होते, आता जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आ. संजय गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.