खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार पक्षाचा! इच्छुकांची संख्या अधिक असणे हे पक्ष मजबूत असल्याचे आणि पक्षात लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण..
Nov 11, 2023, 09:30 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका आता तोंडावर आहेत. गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. देशातील जनतेचा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून येईल. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एका महायुतीचाच खासदार होईल अशी प्रतिक्रिया खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली. "लोकसभा उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार संजय गायकवाड इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत" याबाबत छेडले असता खासदार प्रतापराव जाधव यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
"महायुती मध्ये सध्या शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. तिन्ही पक्ष एकत्र बसून उमेदवार ठरवण्याच्या निर्णय होईल. उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार हा पक्षाचा आहे, बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी कुणी इच्छुक असेल तर हे पक्ष मजबूत व पक्षात लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे." असेही खासदार प्रतापराव जाधव म्हणाले.