खासदार प्रतापराव जाधवांकडून आजही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी! शेतकऱ्यांना धीर दिला; तातडीने मदत देण्याचे प्रशासनाला निर्देश! म्हणाले, सरकार तुमच्यासोबत..

 
Gvvhj
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्र आणि राज्य सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील अतिवृष्टीने संकटात सापडलेला कोणताही शेतकरी, ग्रामस्थ मदतीपासून वंचित राहणार नाही. एनडीआरएफ च्या निकषापेक्षा तीन पट अधिक मदत पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महापुराने झालेले नुकसान वेदनादायी आणि काळीज हेलावणारे आहे. मात्र या संकटसमयी हे सर्वसामान्यांचे सरकार आपल्यासोबत आहे असा शब्द खा.प्रतापराव जाधव यांनी पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यादरम्यान संकटग्रस्तांना दिला.सलग दुसऱ्या दिवशीही आज,२४ जुलैला खा.जाधव अतिवृष्टीग्रस्त भागात दौऱ्यावर आहेत.

२२ जुलैला जळगाव जामोद ,संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील गावांना अतिवृष्टीने झोडपले. जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, २०३ गुरे दगावल्याची नोंद शासकीय दफ्तरी आहे. २२८६ नागरिक महापुरामुळे बेघर झाले आहेत. दरम्यान काल खा.प्रतापराव जाधव यांनी  संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. महापूराची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी या भागातील नंद्यांचे खोलीकरण व सरळीकरण करण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. जाधव म्हटले होते. त्यानंतर आज देखील खा.जाधव सकाळपासून पुरग्रस्त भागात आहेत. 

 मिळेल त्या रस्त्याने खा. जाधव गावागावांत पोहचत असून शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. आज सकाळपासून खातखेड, बोंडगाव, मनसगाव, भोंनगाव, सगोडा, भास्तन या गावांत खा. प्रतापराव जाधवांनी भेट दिली. त्यानंतर जळगाव जामोद शहर व परिसरातील गावांना ते भेटी देणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. यावेळी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, तसेच स्थानिक शिवसेना भाजपचे पदाधिकारी खा. जाधव यांच्यासोबत होते.