खासदार प्रतापराव जाधवांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी! म्हणाले, आपदग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा तीन पट अधिक मदत मिळणार!

पुराची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नंद्यांच्या खोलीकरणाची गरज, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दिला शब्द! जिल्हाधिकाऱ्यांना दिले "हे" निर्देश...
 
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात काल, २२ जुलैला अक्षरशः आभाळ फाटले. मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. २०० पेक्षा अधिक जनावरे दगावली. अनेकांची घरे पुरात वाहून गेली तर एका शेतकऱ्याचा पुरात वाहून मृत्यू झाला. दरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनी आज नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांना धीर दिला. नागरिकांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. आज सकाळपासूनच खासदार जाधव विविध गावांत जाऊन पुरग्रस्तांची विचारपूस करीत आहेत, उद्या देखील ते विविध गावांत जाऊन पाहणी करणार आहेत.
Hdhd
"झालेले नुकसान भरून येणारे नाही. शेतकऱ्यांनी पेरणी केलेली शेती खरडून गेली आहे. अनेक गावांतील घरे वाहून गेली, जनावरे दगावली. काही घरांतील स्वयंपाकाचे सामान, अन्नधान्य देखील वाहून गेले आहे. या संकटसमयी राज्य आणि केंद्र सरकार आपल्यासोबत आहे." असा शब्द यावेळी खासदार जाधव यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिला. सध्याचा सरकारने एनडीआरएफ च्या निकषापेक्षा तीन पट मदत आपदग्रस्तांना द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील आपदग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून सरसकट पंचनामे करून बेघर व बाधित कुटुंबांना दोन दिवसात आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिल्याचे खा.जाधव यांनी सांगितले.
नदी खोलीकरण हा पर्याय
जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील बहुतांश नद्या या पर्वतरांगांतील असल्याने उथळ आहेत. पर्वतावरून उतरणारे पाणी वेगाने येते आणि ते थेट शेतात किंवा गावात घुसते . त्यामुळे खोलीकरण आणि सरळीकरण केल्याने पुराची समस्या कायमस्वरूपी निकाली निघू शकते. या कामाचा कृती आराखडा तयार करून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. जाधव यावेळी म्हणाले. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, बावनबीर, पांचाळा, एकलारा, काथरगाव, पिंप्री या गावांना खा.जाधव यांनी भेट दिली. पुरात वाहून गेलेल्या बानोदा येथील शेतकरी मदन धुळे यांचे घरी जाऊन त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार, मंडळ अधिकारी, त्या त्या गावांचे ग्रामसेवक, तलाठी, भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.