खासदार जाधव, आमदार संजय गायकवाडांच मुख्यमंत्री शिंदेंनी ऐकल नाही! राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील झाले बुलडाणा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री! आजच येणार जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

 
Hdhdjd
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार, दोन आमदार आहेत. अशा स्थितीत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याकडे बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाऊ देणार नाही अशी घोषणाच बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर केली होती. खासदार प्रतापराव जाधव यांनीही अशाच आशयाचे विधान यापूर्वी अनेकदा केले होते. मात्र आज,४ ऑक्टोबरच्या मुहूर्तावर बुलडाणा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे खासदार जाधव, आमदार गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतले नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
खासदार जाधव, आमदार गायकवाड, आमदार रायमुलकर यांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर आगपाखड केली होती. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकच आमदार असताना सुद्धा त्यांनाच पालकमंत्री पद दिल्याने शिवसेनेसोबत विकासकामाबाबत दूजाभाव होत असल्याचा आरोप खासदार जाधव, आमदार गायकवाडांनी केला होता.दरम्यान नंतरच्या काळात अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी आमदार गायकवाडांना पत्रकारांनी छेडले असता, काही झाले तरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळू देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील बुलडाणा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री झाले आहेत,त्यामुळे खासदार जाधव, आमदार गायकवाडांची अडचण झाली आहे..
दिलीप वळसे पाटील आजच जिल्ह्यात येणार.. 
दरम्यान पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. आज,४ ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊवाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रागृहावर त्यांचे आगमन होणार असून तिथेच मुक्काम करणार आहे. उद्या ५ ऑक्टरला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. दुपारी साडेबाराला आमदार डॉ. शिंगणे यांच्या निवासस्थानी त्यांनी राखीव वेळ दिला आहे. दुपारी दिडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.