मोताळा, संग्रामपूर नगरपंचायत निवडणूक... बहुमतासाठी निर्णायक आठ जागांसाठी उद्या मतदान! ८ केंद्र; १९ जानेवारीला निकाल
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे प्रत्येकी १७ सदस्यीय असलेल्या या संस्थांची लढत दोन टप्प्यांत घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी निवडणूक पार पडली तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ४ जागांसाठी उद्या, १८ जानेवारीला मतदान होणार आहे. संग्रामपूरमध्ये महाविकास आघाडी, भाजप आणि प्रहार - संग्रामपूर मित्र आघाडी अशी तिहेरी लढत तर मोताळ्यात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या १३ जागांच्या लढतीच्या एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याइतक्या जागा मिळणार नाही असा अंदाज आहे. दोन्ही ठिकाणी ४ जागांसाठी प्रत्येकी १५ उमेदवार रिंगणात आहेत.
तहसीलमध्ये मतमोजणी
दरम्यान मोताळ्यात प्रभाग ७, १०, १४ आणि १६ साठी ४ मतदान केंद्र राहणार आहेत. संग्रामपूरमधील ८, १०, ११ आणि १६ या प्रभागांसाठी ४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यान मतदान होणार आहे. बहुरंगी लढती, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ३० उमेदवारांनी प्रचारात आपले सर्वस्व पणाला लावले. यामुळे दोन्ही ठिकाणी उत्साही मतदान होणार हे उघड आहे. यापाठोपाठ बुधवारी संबंधित तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून, ३४ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत.