नामांकनाचा मुहूर्त तोंडावर; पण भाजपचा उमेदवार गुलदस्त्यातच!

821 सदस्यासह राजकीय वर्तुळाची उत्सुकता ताणली!! उद्यापासून नॉमिनेशन
 
shivsena bjp

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यस्तरावर महाविकास आघाडी आणि भाजपा नेत्यांमधील राजकीय संघर्ष टोकाला गेला असल्याच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या  विधान परिषदेच्या लढतीत या आरपारच्या संघर्षाचे प्रतिबिंब दिसेल. त्याचे पडसाद उमटून या लढती अधीकच तीव्र ठरतील, अशी दाट शक्यता वर्तविण्यात आली. यंदाची निवडणूक राजकीय आणि धनशक्तीचा रणसंग्राम ठरेल असा माहौल तयार झाला. मात्र नामांकनाचा मुहूर्त तोंडावर आला असतानाही भाजपचा उमेदवार जाहीर न झाल्याने 821 सदस्य मतदारांसह 3 जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्यापासून नामांकनाला सुरुवात होत असताना उमेदवाराचे नाव गुलदस्त्यातच असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या अकोला- बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक येत्या 10 डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत विद्यमानच नव्हे तर मागील तब्बल 18 वर्षांपासून  आमदार असलेले शिवसेनेचे गोपिकीशन बाजोरिया हेच आघाडीचे उमेदवार असतील हे उघड आहे. 2004, 2010 आणि 2016 अशा सलग 3 लढतीत त्यांनी विजयाची हॅट्‌ट्रिक करण्याची किमया साधली. मागील लढतीत त्यांची हॅट्‌ट्रिक हुकणार, अशी हवा असताना त्यांनी राष्ट्रवादीचे रवींद्र सपकाळ यांचा 274 मतांच्या फरकाने सहज विजय मिळविला. आताही ते हॉट फेव्हरेट असताना भाजपा  आपल्या राजकीय ताकद व प्रबळ संघटनाच्या पाठबळावर आघाडी अर्थात बाजोरियांसमोर कडवे आव्हान उभे करतील असा रागरंग आहे. मात्र भाजपचा उमेदवार नामांकनाच्या पूर्वसंध्येला देखील जाहीर न झाल्याने विविध राजकीय तर्क, वितर्क व्यक्त होत आहे.

उद्यापासून नॉमिनेशन
या पार्श्वभूमीवर उद्या 16 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा या निवडणुकीची अधिसूचना जाहीर करणार आहेत. याच दिवसांपासून नामांकन प्रक्रियेला सुरुवात होत आहे. 23 नोव्‍हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र 19 नोव्‍हेंबरला गुरू नानक जयंती आणि शनिवार व रविवार असे सलग दिवस सुटी आली आहे. यामुळे नामांकनसाठी पाचच दिवस मिळणार आहेत. त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 अशी मर्यादित वेळ आहे. यामुळे उमेदवार ठरणार कधी आणि तो अर्जासोबत लागणारी भरमसाठ कागदपत्रे, शपथपत्रे जमविणार कधी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  याशिवाय तीन जिल्ह्यांत प्रचार, भाजपाच नव्हे अन्य नेत्यांशी करावयाचा संपर्क व "वाटपाचे' नियोजन अशा एक ना अनेक भानगडी आहेत. परिणामी, इतर बाबतीत आघाडीवर राहणाऱ्या भाजपच्या उमेदवारीचा प्रश्न खमंग चर्चा आणि व्यापक उत्सुकतेचा विषय ठरलाय!