आमदार श्वेताताईंची शेतकऱ्यांसाठीची फेसबुक पोस्ट चर्चेत! म्हणाल्या, आशिर्वादाचे धनी व्हा, पापाचे वाटेकरी होऊ नका!
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी काही विकृत मंडळींकडून सुड्या पेटवून दिल्याचे प्रकार समोर आले आहेत. दरम्यान या विषयाला धरुनच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी एक फेसबुक पोस्ट केली असून त्यात "आशिर्वादाचे धनी व्हा, पापाचे आणि गैरकृत्याचे वाटेकरी होऊ नका !" अशी विनंती केली आहे..
काय आहे फेसबुक पोस्ट?
घामाने पिकवलेल्या मोत्याच्या दाण्यांची राखरांगोळी करू नका...! गेल्या काही दिवसांपासून चिखली - बुलढाणा परिसरात सोयाबीनच्या सुड्या जाळण्याचे दुर्दैवी प्रकार वाढल्याचे आढळून येत आहे. एकीकडे सोयाबीनच्या काढणीनंतर ते बाजारात नेण्याची शेतकऱ्याची लगबग आणि दुसरीकडे या बळीराजाच्या वाईटावर टपलेल्या काही विकृत लोकांचे कारस्थान असे विरोधाभासी चित्र नक्कीच मनाला वेदना देणारे आहे. चिखलीजवळच असलेल्या साकेगाव येथील अमर भास्कर पाटील यांच्या शेतातील सोयाबीनची सुडी अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याचे दुर्दैवी दृश्य मी आजच पाहिले आणि मनाला खूप हळहळ वाटली.यावेळी पोलीस पाटील सुनील निकाळजे, कृषी सहाय्यक वैशाली सोलाट, तलाठी खरात मॅडम,ग्रामसेवक सुभाष वीर, शेतमालक बी आर पाटील, देविदास डुकरे पाटील उपस्थित होते
खरे तर माझा शेतकरी बांधव हा जगाचा पोशिंदा आहे. आणि या पोशिंद्याने नेहमीच सर्वांना अन्नाचा घास भरवला आहे. मात्र, याच शेतकरी बंधूकडून आपल्याच गावकऱ्याशी, धुरकार्याशी, भाऊबंदाशी, सोयऱ्याशी कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून दुश्मनी काढण्याचा हा प्रकार अतिशय चुकीचा व खेदजनक असून काळ्या आईची केलेली ही क्रूर थट्टा आहे हे मला इथे आवर्जून सांगावसं वाटतंय. त्यामुळे मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करते की कृपया एकमेकांवर राग काढण्याच्या नादात आपल्या घामाने पिकवलेल्या मोत्याच्या दाण्यांची राखरांगोळी करू नका.
शेतकरी बांधवांनी पिकवलेला घास कोणाच्या तरी मुखात जाईल आण त्याच्याकडून आशीर्वाद मिळेल. त्या आशीर्वादाचे धनी व्हा! पापाचे आणि गैरकृत्याचे वाटेकरी होऊ नका!! हीच एक शेतकऱ्याची लेक म्हणून हात जोडून विनंती." अशी पोस्ट आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे..