Amazon Ad

करोडपती..!खा.प्रतापराव जाधव यांच्याकडे १५२,९२०,४४८ रुपयांची संपत्ती! ५ वर्षात ४ कोटी २४ लाख ७ हजार ४८२ रुपयांची वाढ! शेती किती? वाचा..खा. जाधवांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात काय लिहिलंय...

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार प्रतापराव गणपतराव जाधव यांनी काल २ एप्रिलला जंगी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खा.प्रतापराव जाधव यांनी निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर केले. या शपथपत्रात खा.प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरण सादर केले आहे. या शपथपत्रात खा.जाधव यांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीकडे असलेली रोख रक्कम, बँकेतील ठेवी, दागिने, शेती, प्लॉट, वाहने , व्यावसायिक भागीदारी यासह बांधकाम केलेल्या इमारतीची माहिती दिली आहे. खा.जाधव व त्यांच्या पत्नी सौ.राजश्री प्रतापराव जाधव यांच्याकडे मिळून एकूण १५ कोटी २९ लाख २० हजार ४४८ रुपयांची संपत्ती आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खा.जाधव यांनी शपथपत्र सादर केले तेव्हा त्यांच्याकडे एकूण ११ कोटी २६ लाख ७२ हजार ९६६ रूपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता ५ वर्षात त्यात ४ कोटी २४ लाख ७ हजार ४८२ रुपयांची वाढ झाली आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे स्वतःच्या नावावर १६ एकर तर पत्नीच्या नावावर ५१ एकर शेतजमीन आहे. खा.जाधव यांच्याकडे काल,२ एप्रिलच्या तारखेत ३ लाख ५० हजार रुपये रोकड तर सौ. राजश्री जाधव यांच्याकडे १ लाख ८० हजार रुपयांची रोकड आहे.
शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार खा.जाधव यांचे वार्षिक उत्पन्न ६५ लाख ७८ हजार ८० रुपये एवढे आहे तर त्यांच्या पत्नी सौ.राजश्री जाधव वर्षाला ३२ लाख ४४ हजार ६२० रुपये कमावत असल्याचे शपथपत्रात नमूद आहे .खा.जाधव यांनी त्यांच्या उत्पन्नाचे साधन शेती व खासदार म्हणून मिळणारे वेतन तर पत्नी सौ राजश्री जाधव यांच्या उत्पन्नाचे साधन शेती, हॉटेल, इस्सार कंपनीचा पेट्रोल पंप, वेअर हाउसिंग मधून मिळणारे उत्पन्न असे दाखवले आहे.
खासदार जाधव यांच्याकडे २ कोटी २२ लाख २१ हजार ५३३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर पत्नी सौ.राजश्री जाधव यांच्याकडे २ कोटी ४३ लाख २३ हजार ८९० रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यात रोकड, बँकांमधील रक्कम, फिक्स डिपॉझिट, पॉलिसी, शेअर्स, दागिने, वाहने यांचा समावेश आहे.
खा.जाधव यांच्याकडे त्यांनी स्वकष्टाने अर्जित केलेली २ कोटी ७४ लाख ६२ हजार ५२५ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नी सौ.राजश्री जाधव यांच्याकडे ५ कोटी ९६ लाख ९३ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ज्यात शेती, प्लॉट, फ्लॅट चा समावेश आहे. खा.जाधव यांच्या नावावर १६ एकर तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ५१ एकर शेती आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैसपुर येथे सौ.राजश्री जाधव यांच्या नावावर ९ एकर शेती आहे, मेहकर तालुक्यातील खंडाळा, खामगाव, गोळेगाव, माळसावरगाव यासह इतर ठिकाणी सौ.राजश्री जाधव यांच्या नावावर शेती आहे. खा.प्रतापराव जाधव यांना वारसाहक्काने १ कोटी ९० लाख ८४ हजार ५०० रुपयांची संपत्ती मिळाली आहे, ज्यात मुळ गाव मादणी येथील शेतजमीन , मेहकर येथील राहत्या घराचा समावेश आहे तर त्यांच्या पत्नी सौ. राजश्री यांना ६० लाख ७५ हजार रुपयांची मालमत्ता वारसाहक्काने मिळाली आहे. श्री व सौ.जाधव या दोघांची जंगम मालमत्ता,स्थावर मालमत्ता आणि वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता १५ कोटी २९ लाख २० हजार ४४८ रुपयांची आहे. खासदार जाधव यांचे शिक्षण बीए प्रथम वर्षांपर्यंत झाले आहे, आजघडीला खा. जाधवांचे वय ६३ वर्षे आहे. गत ३० वर्षांपासून ते लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.