Amazon Ad

दूध उत्पादक शेतकऱ्यांनो,सगळी कामे बाजूला ठेवा अन् उद्या धाड येथे पोहचा! दुग्ध व्यवसाय व पशुपालन मार्गदर्शन कार्यशाळा;

राजर्षी शाहू फाऊंडेशन आणि वन बुलढाणा मिशनचा उपक्रम! अहमदनगरचे पशुवैद्यकीय तज्ञ डॉ. महेश पारखे करणार मार्गदर्शन
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपण शेतकरी, पशुपालक, दुग्ध व्यावसायिक असाल आणि आपणास दुग्ध व्यवसायात क्रांती घडवायची असेल तर उद्या ७ जुलैचा रविवार आपणासाठी संधी घेऊन आला आहे. उद्याची कामे बाजूला ठेवा. सकाळी ११ वाजता धाड येथील जिजाऊ ज्ञान मंदिरमध्ये पोहचा. तिथे दुग्ध व्यवसाय व पशुपालन मार्गदर्शन कार्यशाळा आपली वाट पाहत आहे. याठिकाणी अहमदनगरचे प्रख्यात पशुवैद्यकीय तज्ञ डॉ. महेश पारखे हे मार्गदर्शन करणार आहेत. मागील २० वर्षांत दुग्ध व्यवसायात केली नसेल एवढी प्रगती पुढील तीन ते पाच वर्षांत करता येईल, अशा टिप्स ते देणार आहेत. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
दूध ही दैनंदिन जीवनातील आवश्यक बाब आहे. दुधाची मागणी लक्षात घेतली तर त्याप्रमाणात पुरवठा होत नाही. आपल्या जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाची परिस्थिती गंभीर आहे. सहकारी तत्वावर चालणारा एकही दूध संघ जिल्ह्यात नाही. बाहेरील कंपन्या दूध संकलित करुन नेतात.
  आपल्याला त्यांच्या दुधावर अवलंबून राहावे लागते. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, पशुपालक, दुग्ध उत्पादकांनी साधलेली प्रगती पाहली तर नवल वाटते. आपल्या भागातही हा बदल घडावा, आपला शेतकरी सुखी व्हावा या उद्देशाने दुग्ध व्यवसाय व पशुपालन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.