भूमिपुत्रांना जिल्ह्यातच रोजगार देण्यासाठी एमआयडीसींची गरज !संदीप शेळकेंचे प्रतिपादन; म्हणाले, जिल्ह्यातील हुकूमशाही मोडीत काढण्याची गरज! जानेफळात संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 
Sss
जानेफळ (अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्य अडचणीतून जात आहेत. बेरोजगारी मोठी आहे. युवकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मोठे प्रकल्प, कंपन्या नाहीत. रोजगाराचा प्रश्न गहण झाल्याने युवकांना बाहेरच्या जिल्ह्यात रोजगाराकरिता भटकंती करावी लागते, हीच मोठी शोकांतिका आहे. त्यासाठी जिल्ह्यात एमआयडीसी उभारण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. जिल्ह्याच्या हजारो, लाखो भूमिपुत्रांना स्वजिल्ह्यातच रोजगाराची व्यवस्था करण्याचे प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.

मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे शनिवारी वन बुलढाणा मिशनअंतर्गत 'जाहीरनामा जनतेचा' कार्यक्रमांतर्गत संवाद मेळावा पार पडला. याप्रसंगी जिल्ह्याचा शाश्वत विकास, बेरोजगारांना रोजगार, सिंचनासह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांना हात घालत संदीप शेळके यांनी मार्गदर्शन केले. या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी राजकीय चळवळीत सहभागाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी संबोधित करताना नमूद केले. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्यात बुलढाणा जिल्ह्याचे नाव अग्रभागी असावे, ही महत्त्वाकांक्षी संदीप शेळके यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, प्रत्येक विषयांवर चिंतन, मंथन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात सात एमआयडीसी आहेत. यापैकी तीन जेमतेम सुरू आहेत. उद्योग उभारले तर, भूमिपुत्रांना येथेच रोजगार मिळेल. जिल्ह्यात एकतरी पाच, दहा हजार लोकं काम करू शकतील या क्षमतेची प्रशस्त कंपनी आहे का? आपण ज्यांना निवडून देतो, ते युवकांच्या बेरोजगाराची प्रश्न सोडवू शकत नाही? ही खंत ओळखण्याची आज गरज आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी उभारल्यास बेरोजगारी निश्चितच दूर होऊन युवावर्गाची भरभराट होण्यास हातभार लागेल आणि त्याचदृष्टीने भविष्यात आपले प्रयत्न असतील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. शेतकऱ्याला सिंचनाची सोय झाली पाहिजे. फळपिके, फुलपिके वाढले पाहिजे, प्रक्रिया उद्योग व्हावेत, प्रोसेसिंग युनीट वाढले पाहिजेत. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनता सुखी होण्याकरिता राजकीय इच्छाशक्ती हवी आहे.
लोणारमध्ये देश, विदेशातून पर्यटक येतात. हेच ऐतिहासिक ठिकाण दुसरीकडे असते, तर त्याचा विकास होऊन हजारोंना रोजगार मिळाला असता. तेथे अस्वच्छता आहे, पर्यटकांना येऊ वाटत नाही. आले तर राहू वाटत नाही. चांगले गार्डन नाही. जिल्ह्यात जलप्रकल्प आहेत, अभयारण्य आहेत, तेथे चांगली पर्यटन स्थळे निर्माण होऊ शकतात, असेही संदीप शेळके म्हणाले.

तरुण मुले, मुली सैन्य, पोलीस भरतीसाठी जीव धोक्यात घालून रस्त्याने धावतात. त्यांच्यासाठी क्रीडांगण असू नये का? गावात लायब्ररी असू नये का? युवक, युवती गावातील छोट्याशा लायब्ररीमध्ये जावून यूपीएससी, एमपीएससीची तयारी करून उच्चपदस्थ अधिकारी होऊ शकत नाहीत का? असे अनेक प्रश्न तत्परतने सोडवण्याची गरजदेखील त्यांनी प्रतिपादित केली.

याप्रसंगी गजाननतात्या कृपाळ, विश्वासराव सवडतकर, हिंमतराव आवले, संजय सुळकर, प्रकाश राठोड, सदानंद देवकर, हावरे, डगडाळे, सचिन गवई, अमर राऊत, प्रदीप मवाळ, नागेश डवंगे, अनिल वाळूकर, मोहन पाटील यांच्यासह युवावर्ग, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेचा नेत्यांवर दबाव असावा

जनता अर्थात मतदार, नागरिक सर्वोच्च आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधूता यावर आधारलेली घटना तयार केली. त्या घटनेनुसार प्रत्येकाला सारखा अधिकार आहे. जनतेने नेत्यांवर आपले 'वजन' ठेवले पाहिजे. मात्र, येथे उलटेच घडत आहे. नेते जनतेवरच दबाव ठेवतात, धाक दाखवतात, दडपशाही करतात. ही लोकशाही आहे की ठोकशाही याचा जाब विचारला पाहिजे. तुमचा दबाव नेत्यांवर असला पाहिजे, असेही संदीप शेळके यांनी यावेळी ठासून सांगितले. दादागिरी हुकूमशाही मोडीत काढण्याचे आवाहन त्यांनी केले.

जनसमस्या नोंदवण्यासाठी बुथ
जनसमस्या जाणण्यासाठी गावोगावी बुथ लावले आहेत. तुम्ही तेथे आमच्याकडे सूचना नोंदवा. पक्ष पक्षांचा जाहीरनामा आणतात, मी जनतेचा जाहीरनामा आणला आहे. जनतेत जातो, भगिनींच्या वेदना ऐकतो, तेव्हा मनाची कासावीस होते. त्यांच्या वेदना स्वस्थ बसू देत नसल्याचे ते यावेळी म्हणाले.