मेहकर तालुका अन् शहर काँग्रेसला राहुल गांधींचे काहीच देणघेणे नाही का हो? देशभरात आंदोलने होत असताना मेहकरचे काँग्रेस कारभारी करतात तरी काय? ...तेव्हाही आवाज झाला नाही..

 
congress
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेस नेते राहुल गांधींना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. भाजप सरकारने दडपशाही सुरू केल्याचा आरोप करीत देशभरात काँग्रेस व विरोधी पक्षांनी या प्रकरणाचा निषेध केला. जिल्ह्यातील तालुका केंद्रावर आंदोलने झाली. स्वतः जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी तसे आदेशच जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले होते.मात्र मेहकर तालुका आणि शहर काँग्रेसने मात्र ते आदेश फाट्यावर मारल्याचे दिसले. ना कुठे आंदोलन ,ना कुठे निषेधाचे निवेदन! मेहकर काँग्रेसचे सगळेच कारभारी या आंदोलनातून गायब दिसले. जणू काही,  तिकडे दिल्लीच्या राहुल गांधीचे आम्हाला काय देणेघेणे असेच या कारभाऱ्यांना वाटत असावे..!
 

 खासदार प्रतापराव जाधवांचा गड असलेल्या मेहकरात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून काँग्रेसकडे पहिल्या जाते. मात्र असे असले तरी तालुका आणि शहरात काँग्रेस केवळ पदाधिकाऱ्यांपुरतीच उरली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. जो - तो पदाधिकारी स्वतःला नेता म्हणवून घेत असल्याने आंदोलन करायला, घोषणा द्यायला रस्त्यावर कार्यकर्ता म्हणून कोण उतरेल हाही एक महत्वाचा प्रश्न या नेत्यांपुढे असेल कदाचित..गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे पद मिरवणारे श्याम उमाळकर, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले माजी नगराध्यक्ष कासम गवळी, तालुकाध्यक्ष देवानंद पवार अशी बडी मंडळी मेहकर काँग्रेसमध्ये आहेत खरी, मात्र आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते मिळत नसतील तर संघटना उभारणीसाठी या मंडळींचे योगदान काय असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणुक लढणारेही इतर वेळी पक्षकार्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. केवळ निवडणुका आल्या की पुढे पुढे करायचे, मोठेपणासाठी पदे मिरवणारी ही नेतेमंडळी मात्र राहुल गांधींसाठी पुढे येतांना दिसली नाही. एव्हढेच काय तर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याविरुद्ध चिखलीत दरोड्याचे गुन्हे दाखल होऊनही मेहकरातून फारसा आवाज होतांना दिसला नाही. बरं जाऊद्या..त्यांना त्यांच्या पक्षाचे देणेघेणे नाही तर आपल्याला काय करायचे...