मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा विकासाचे मॉडेल बनवणार! रविकांत तुपकरांचे प्रतिपादन; उदयनगर, अमडापूर व कोलारा येथे जोरदार सभा...

 
Ss
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): - मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा हा राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आणि छत्रपती शिवरायांचे आजोळ आहे. परंतु आजही या जिल्ह्याच्या माथ्यावर मागासले पणाचा कलंक आहे. गेल्या पंधरा वर्षात विद्यमान खासदार साहेबांनी स्वतःच्या परिवाराच्या आर्थिक विकासावरच भर दिला आहे, जिल्ह्याचं मात्र त्यांनी वाटोळ केलं आहे. आज सर्वसामान्य जनता मला भरभरून आशीर्वाद देत आहे. तुमचं हे बळ आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच कायम असू द्या, बुलढाणा जिल्ह्याला आपण विकासाचा मॉडेल बनवू, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले. काल १७ एप्रिल रोजी उदयनगर, अमडापुर व कॊलारा येथे रविकांत तुपकारांच्या जोरदार सभा झाल्या.
Gdhb
Advt. 👆
चिखली तालुक्यातील उदयनगर, अमडापुर व कोलारा या तिन्ही ठिकाणी रविकांत तुपकरांच्या सभांना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांचा उत्साह आणि प्रतिसाद तुपकर यांना बळ देणारा ठरला. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, प्रत्येक समाजातून आणि समाजातील प्रत्येक घटकातून मला मिळणारा वाढता पाठिंबा आणि समर्थन पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आता वेगवेगळ्या अफवा पसरवत असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. मी सर्वसामान्य जनतेने उभा केलेला स्वतंत्र उमेदवार आहे आणि निवडून आल्यानंतरही मी स्वतंत्रच राहील असे प्रतिपादन यावेळी तुपकर यांनी सांगितले. गेल्या २२ वर्षात शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य जनतेसाठी लढा दिला आहे. हजारो आंदोलने केली, शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या, पोलिसांचा मार सहन केला, तडीपारी भोगली तुरुंगात गेलो हे सर्व सामान्य जनतेसाठी केले. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, आशा व अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, अतिक्रमणधारक, आदिवासी, बारा बलुतेदार व शहरी नागरीक अशा सर्वच घटकांसाठी मी काम करत आलो आहे. त्यामुळे सर्व जाती धर्मातील आणि शहरी व ग्रामीण भागातील जनता माझ्यासोबत आहे. खऱ्या अर्थाने हा लढा आता 'जनशक्ती विरुद्ध धनशक्ती' असा झाला आहे. मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि शेवटपर्यंत सर्वसामान्य जनतेचाच राहणार आहे. माझा विजय हा सर्वसामान्यांचा विजय ठरणार आहे. सिंदखेडराजा, शेगाव, लॊणार, संत चोखामेळा यांचे जन्मस्थळ मेहुणाराजा, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक सैलानी बाबा दर्गा यासह जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा कायापालट होणे गरजेचे आहे. विद्यमान खासदारांनी गेल्या पंधरा वर्षात जिल्हा भकास करण्याचे काम केले आहे, ही चूक आता आपल्याला दुरुस्त करायची आहे. या जिल्ह्यात सूतगिरण्या सुरू झाल्या पाहिजे, कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजे, नवे उद्योग - व्यवसाय जिल्ह्यात आले पाहिजे, सिंचनाचा अनुशेष दूर झाला पाहिजे, बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे या भूमिकेतून आपल्याला समोर जायचे आहे. बचत गटातील महिलांना खोटी आश्वासने देऊन खोट्या योजना सांगून त्यांची फसवणूक केली जात आहे, महिलांनी सावध झाले पाहिजे. बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, तरुण, सर्वसामान्य नागरिक यांच्या हितासाठी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून गेल्या २२ वर्षांत केलेल्या कामाची संघर्षाची पोचपावती म्हणून एक मत द्या असे आवाहन यावेळी रविकांत तुपकरर यांनी केले. "एक नोट आणि एक वोट" या संकल्पनेतून अनेकांनी आर्थिक मदत देऊन मातृपी आशीर्वाद देण्याच्या आश्वासन तुपकर यांना दिले. घरची चटणी भाकर खाऊ, स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून फिरू पण आता आपल्या हक्काचा, जनसामान्यांचा माणूस दिल्लीला पाठवू, असा विश्वास उपस्थितांनी रविकांत तुपकर यांना दिला.