उद्या बुलडाणा आणि चिखलीत महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा ! खा.जाधव आता फ्रंटफुटवर येऊन खेळणार! खा.जाधवांना चौथ्यांदा विजयी करण्यासाठी महायुती आखणार व्युव्हरचना..

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आज २८ मार्चच्या संध्याकाळी खा.प्रतापराव जाधव यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. ही बातमी पसरताच जिल्ह्यात ठिकठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. खा.जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्या बुलडाणा आणि चिखली विधानसभेच्या महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुलडाणा आणि चिखली येथे हे दोन मेळावे होणार आहेत.
  तीन वेळा चढत्या फरकाने निवडणूक आलेल्या खा.जाधवांना पुन्हा चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाले आहे. त्यामुळे अधिकृतरित्या खा.जाधव यांच्या प्रचाराची सुरूवात झाली आहे. उद्या, बुलडाणा येथील धाड नाका परिसरातील ओंकार लॉन्स वर सकाळी १० वाजता तर दुपारी १ वाजता चिखली येथील सवणा फाट्यावरील आशीर्वाद मंगल कार्यालयात महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. स्वतः खासदार प्रतापराव जाधव , आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय कुटे, माजी आमदार धृपदराव सावळे यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून याच मेळाव्यात खा.जाधव यांना चौथ्यांदा विजयी करण्यासाठी व्युव्हरचना आखण्यात येणार आहे. अधिकृत रित्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खा.प्रतापराव जाधव उद्या फ्रंटफुटवर येऊन फटकेबाजी करण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या दोन्ही मेळाव्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान आज सायंकाळी खा.जाधव आणि आ.गायकवाड यांनी ओंकार लॉन्स वर जाऊन तयारीचा आढावा घेतला.