Amazon Ad

संतोष भुतेकरांच्या पाठीशी महायुती; खोटे गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा..! चिखली, देऊळगाव राजा तहसीलदारांना निवेदन

 
चिखली( ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वाळू माफियां विरोधात सातत्याने आंदोलन करणारे युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी काही दिवसांपूर्वी इसरूळ येथे लक्षवेधी आंदोलन केले. यामध्ये रितीचे टिप्पर अडवून चक्क जिल्हाधिकारी यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने भुतेकर यांच्यासह इतर आंदोलकांविरुध्द गुन्हे दाखल केले. यांनतर आता महायुती भुतेकर यांच्या पाठीशी उभी राहिली असून, आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी आज १९ जुलै रोजी चिखली आणि देऊळगाव राजा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
मागील काही दिवसांपासून चिखली तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरात अवैध रेतीवाहतुकीने हैदोस घातला होता. एवढेच नाही तर, सुसाट टिप्पर वाल्यांनी निष्पाप जीवांना शिरडून ठार केल्याच्या घटनाही समोर आल्या. यासंदर्भात प्रशासनाला व थेट जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवाल्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. अखेर वैतागून, युवासेना उपजिल्हाप्रमुख यांनी पदाधिकाऱ्यांसह इसरूळ येथे आंदोलन केले. त्यामध्ये, रेती वाहतुकीची टिप्पर अडवून जिल्हाधिकाऱ्यांचे संतप्त आंदोलकांनी पोस्टरला जोडे मारले. या प्रकारामुळे प्रशासनाने देखील आंदोलनाला प्रत्युत्तर दिले, संतोष भुतेकर यांच्यासह इतर आंदोलकांविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात पोलीस अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. आज महायुतीतील असंख्य पदाधिकाऱ्यांनी चिखली तहसील कार्यालय गाठले.
संतोष भुतेकर व इतर आंदोलन वरील गुन्हे मागे घ्यावे. अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांवर गुन्हे दाखल होणे म्हणजे लोकशाहीचा गळा दाबले असे निवेदनात म्हटले असून तातडीने गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना महिला तालुकाअध्यक्ष माया ताई म्हस्के, रयत क्रांती संघटनेचे नेते प्रशांत ढोरे पाटील, शिवसेना शहर अध्यक्ष विलास घोलप, उपतालुका उपाध्यक्ष गजानन म्हस्के, भाजपाचे शिवाजी वाघ , दिपक कळंगे, सरपंच अजबराव जावळे, सरपंच गोपीनाथ लहाने, देऊळगाव राजा येथील शिवसेनेचे सुदाम काकड, श्रीनिवास खेडेकर, शिवाजी कुहुरे, स्वप्निल शहाणे आदी उपस्थित होते.