महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम राजभवनात घेता आला असता! खारघर मध्ये घेतलेला कार्यक्रम राजकीय फायद्यासाठीच;
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा आरोप! म्हणाले, १३ कोटी रुपयांचा खर्च केला मग सामान्य श्री भक्तांना साधा पेंडॉल टाकता आला नाही का? सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
महाराष्ट्रभूषण कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्याचे काम भाजपने केले. १३ कोटी रुपयांचा खर्च शासकीय तिजोरीतून केला मग साधे कपड्याचे छत देखील श्री.भक्तांसाठी टाकता आले नाही का ? असा सवाल यावेळी राहुल बोंद्रेंनी केला. कार्यक्रम नियोजन शून्य होता, शाही व्यवस्था केवळ व्हीआयपी लोकांची होती. उन्हामुळे अनेकांना भोवळ आली, रुग्णवाहिकांचे सायरन वाजत होते मात्र स्टेजवरील लोकांना त्याचे काहीची सोयरसुतक नव्हते असेही राहुल बोंद्रे म्हणाले. शासन सांगत असलेला १४ बळींचा आकडा खोटा आहे, ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमानंतर चेंगराचेंगरी झाली मात्र त्याही बातम्या दाबण्यात आल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. या बळींची संपूर्ण जबाबदारी शासनाची आहे, याची चौकशी झाली पाहिजे. यासंदर्भात दोन दिवसांचे विशेष अधिवेशन झाले पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली, आम्हीही तीच मागणी करीत आहोत असे राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जो पुरस्कार दिला त्याचे राजकारण करणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असेही यावेळी राहुल बोंद्रे म्हणाले.