महादेव जानकर रविकांत तुपकरांच्या भेटीला!

म्‍हणाले, आंदोलनाला यश मिळाल्याने आलो शुभेच्‍छा देण्यासाठी!!
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज, २० नोव्हेंबर रोजी सकाळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विनंतीला मान देऊन अन्‍नत्याग स्त्याग्रह मागे घेतला. गेले ४ दिवस उपाशी असल्याने त्‍यांची तब्येत खालावली. यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात भरती करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजीमंत्री महादेव जानकर यांनी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात तुपकर यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. आंदोलन यशस्वी केल्याबद्दल त्यांनी तुपकर यांना शुभेच्छा देत आता तब्येतीची काळजी घ्या, असा प्रेमाचा सल्ला दिला. यावेळी जानकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या पोरांनी टॉपचे शिक्षण घेतले पाहिजे. क्लर्क नको कलेक्टर पाहिजे, पोलीस नको कमिश्नर पाहिजे आणि सरपंच नको तर खासदार पाहिजे, असे ध्येय शेतकऱ्यांच्या पोरांनी ठेवले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे जानकर म्हणाले.

तुपकर माझे जवळचे मित्र आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. तुपकर चळवळीतले कार्यकर्ते आहेत. स्वतःच्या मुलाबाळांसाठी त्यांनी संघर्ष केला नाही. जनतेसाठी संघर्ष करतो त्याचा इतिहास लिहिला जातो, त्यातीलच एक रविकांत तुपकर आहे. त्यांच्या आंदोलनाला शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे, असे जानकर म्हणाले. मूल रडल्याशिवाय आईसुद्धा पाजायला घेत नाही. पीक विमा कंपन्या सरकारला कशा लुटतात, ब्लॅकमेल करतात हे मला माहीत आहेत. आता शेतकऱ्यांनीही जागृत होण्याची गरज आहे. केवळ शेतीवर अवलंबून राहू नये.

शेतकऱ्याला तीन मुलं, मुली असतील तर एक कलेक्टर झाले पाहिजे. दुसऱ्याने उद्योजक तर तिसऱ्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे खासदार,आमदार झाले पाहिजे, असे ते विनोदाने म्हणाले. शेतकऱ्यांच्या पोरांनीही व्यापार केला पाहिजे. दोनशे एकर शेती असून खायला नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था असते. आधुनिक युगाचे राजकारण, अर्थकारण शेतकऱ्यांच्या मुलांनी केलं पाहिजे. हेलिकॉप्टर कसं बनवायचं ,नासामध्ये कशी एंट्री करायची हे शेतकऱ्यांच्या पोरांना जमलं पाहिजे. केवळ शेतीच्या भरवशावर राहू नका. उद्योजक व्हा, जोडधंदा करा. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याची परिस्थिती सुधारत आहे. टॉपचे शिक्षण घ्या, असेही जानकर म्हणाले.

विदर्भातल्या नेत्यांना म्हणाले...
पश्चिम महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या पक्षाचे नेते विकासासाठी निधी आणायला एका गाडीत जातात. मात्र इकडे ना तुला न्‌ मला घाल कुत्र्याला... अशी परिस्थिती आहे. ही प्रवृत्ती विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या नेत्यांनी बदलली पाहिजे. आम्हा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये राजकारणात भांडणं होतात. पण विकासाला आम्ही कधीच विरोध करीत नाही. म्हणून विकासासाठी एकत्र या, असेही जानकार विदर्भातील नेत्यांना उद्देशून म्हणाले.