नरेंद्र खेडेकरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली! जालिंधर बुधवतांच्या नेतृत्वात बुलडाणा तालुक्यात प्रचार दौरा; आ. धिरज लिंगाडे, जयश्रीताई शेळके, हर्षवर्धन सपकाळही जोमाने भिडले

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.नरेंद्र खेडेकरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत  धीरज लिंगाडे यांच्यासाठी महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने काम केले होते तीच पद्धत खेडेकरांच्या प्रचारासाठी अवलंबली जात आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात काल,११ एप्रिलला बुलढाणा तालुक्यातील विविध गावात प्रचार दौरा संपन्न झाला. आ.धीरज लिंगाडे, काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके, माजी आ.हर्षवर्धन सपकाळ देखील खेडेकर यांच्या प्रचारासाठी जोमाने भिडले आहेत.

"आम्ही निष्ठेचे शिलेदार" या टॅगलाईन खाली नरेंद्र खेडेकर यांचा प्रचार सुरू आहे. स्वतः पक्षप्रमुख उध्दव ठाकरे बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा आढावा घेत आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस खेडेकर यांच्या प्रचारासाठी एकदिलाने काम करीत असल्याचे चित्र आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके यांनी लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते हे खरे मात्र खेडकर यांना अधिकृत रित्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आघाडीधर्माचे पालन या दोन्ही नेत्यांकडून होत आहे. एवढेच नव्हे तर नरेंद्र खेडकर यांच्या प्रचारासाठी स्वतंत्ररित्या दोन्ही नेते आपापले प्राबल्य क्षेत्र असलेल्या क्षेत्रात प्रचार करीत आहेत.

  काल बुलडाणा शहरातील सुंदरखेड भागात आ.धीरज लिंगाडे, जयश्रीताई शेळके यांनी खेडेकर यांच्या प्रचारासाठी रॅली काढली. घरोघरी जाऊन त्यांनी नरेंद्र  खेडेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी बुलडाणा तालुक्यातील साखळी बु, अंत्री तेली, शिरपूर, पांगरी, साखळी खु, अजिसपूर, नांद्रा कोळी, सागवन, कोलवड, तांदुळवाडी, हतेडी बु , हतेडी खु, अंभोडा, झरी या गावांत रॅली काढून नरेंद्र खेडेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.