संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकच भरपूर!
उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांत काँग्रेस १२, भाजपा १९, राष्ट्रवादी काँग्रेस २, प्रहार १५, शिवसेना २, अपक्ष १०, वंचित बहुजन आघाडी १३ असे एकूण ७३ उमेदवारांनी प्रभागनिहाय अर्ज सादर केले, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी तीनपर्यंत अर्ज भरणाऱ्यांची गर्दी कायम होती.
उद्या, ८ डिसेंबरला छाननी, त्यानंतर १३ डिसेंबरला माघार व रिंगणात राहिलेल्या उमेदवारी यादी जाहीर करून चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. यानंतर खऱ्या अर्थाने लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. संग्रामपूर नगरपंचायतीची निवडणूक १७ प्रभागांत होणार होती. मात्र ओबीसींच्या ४ जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या व करत असणाऱ्या उमेदवारांनी व पदाधिकारी पॅनल प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांचा हिरमोड झाला आहे.