पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादानेच अदानीला कर्ज! बुलडाण्यात काँग्रेसचा आरोप! पंतप्रधानांच्या विरोधात निदर्शने

 
Jilha
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकशाहीत आंदोलन एक हत्यार आहे. काँग्रेसने हे हत्यार आता थेट देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उगारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपाआशीर्वादानेच अदानीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप संसदेत करणाऱ्या काँग्रेसने ही लढाई रस्त्यावर आणली. अदानी समूहाला कर्जे देणाऱ्या स्टेट बँक व एलआयसी विरोधात आज बुलडाण्यात शहर व तालुका काँग्रेसने स्टेट बँकेसमोर सत्याग्रह करून जोरदार निदर्शने केली. मागणीचे निवेदनही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

 काँग्रेससह इतर विरोधी पक्ष तीन दिवसांपासून संसदेत अदानी गैरकारभारावर चर्चा करण्याची मागणी करत आहेत पण मोदींचे हुकुमशाही सरकार चर्चा करत नाही. जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या पाठिशी उभा राहिला आहे.

आजही काँग्रेस पक्षानं जनतेचा पैसा सुरक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी यासाठी राज्यभर आंदोलन छेडण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याचे पडसाद बुलडाण्यातही उमटले. त्यामुळे येथील भारतीय स्टेट बँकेसमोर सत्याग्रह आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.अदानीच्या गैरकारभाराची चौकशी होईपर्यंत व जनतेच्या एका-एका पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही, असा इशारा आज शहर व तालुका काँग्रेस कमिटीने दिला आहे. आंदोलनात तालुकाध्यक्ष सुनील तायडे, शहराध्यक्ष दत्ता काकास,दिलीप राजपूत,जीवन जाधव, आरिफ खान आदी काँग्रेस पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.