५ व्यक्ती, ३ वाहने, १० सदस्य अन् कागदपत्रे मात्र भारंभार!
कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना जंगी गर्दी, वाहनांची रेलचेल, ऐक्य दाखविण्यासाठी नेत्यांची मांदियाळी असे चित्र असते. मात्र अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात 16 ते 23 नोव्हेंबर दरम्यान पार पडणाऱ्या नामांकन प्रक्रियेत हे दृश्य दिसणार नाहीये! याचे कारण अर्ज दाखल करताना कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात केवळ 3 वाहने व 5 व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे उमेदवाराला अन्य 4 नेते वा पदाधिकारी यांची निवड करताना नाराजी नाट्याचा विचार करून अति दक्षता व काळजी घ्यावी लागणार आहे.
...आणि कागदपत्रे
दरम्यान नामनिर्देशन पत्र (नमुना २ ई) सादर करताना विविध कागदपत्रे व शपथपत्रे जोडणे बंधनकारक आहे. सर्वात अगोदर अन् महत्त्वाचे म्हणजे अर्जावर १० (मतदार असलेल्या) सूचकांची सही आवश्यक आहे. आता दर आणि दरवाढ लक्षात घेता यासाठी पण उमेदवाराला व्यवस्था करावी लागणार हे उघड आहे. लोकसभा लढतीप्रमाणेच संपत्तीचे विवरण, अपराध विषयक माहिती आदी विविध नमुन्यांतील नोटरी केलेले प्रतिज्ञालेख (नमुना २६), नाव असलेल्या मतदार यादीची प्रमाणित प्रत, मागील बाजूस स्वाक्षरी असलेले पासपोर्ट आकाराचे फोटो, मान्यताप्राप्त वा नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार असल्यास एबी फॉर्म असा सारा सरंजाम करणे भाग पडणार आहे. सर्वसाधारण उमेदवारांना १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती, जमातीच्या उमेदवारासाठी ही रक्कम ५ हजार असून त्यांना यासाठीचा पुरावा द्यावा लागणार आहे. यामुळे नुसता अर्ज भरण्यासाठी किती कसरत करावी लागणार हे स्पष्ट होते. यातही अर्ज अचूक भरावा लागणार असून यात काही गफलत झाली तर २४ नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या छाननीमध्ये अपूर्ण वा चुकीचा अर्ज रद्द होऊ शकतो. यामुळे दक्षता म्हणून बहुतेक उमेदवार प्रसंगी ४ प्रतीत अर्ज भरतात.