निवडणुकिसाठी मर्यादित मतदार; पण नेत्यांचा खर्च बक्कळ; बोकडे कापले, पार्ट्या झोडल्या; आता शेतकरी हिताच्या गप्पा..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या १० पैकी ५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक २८ एप्रिलला पार पडली. उर्वरित ५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक आज,३० एप्रिलला होत आहे. त्यापैकी चिखली, शेगाव लोणारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान या निवडणुकीत मर्यादित मतदार असेल तरी नेत्यांनी या निवडणुकीत बक्कळ खर्च केल्याच्या चर्चा आहेत. जिथे खर्च करायची गरज नाही तिथेही नेत्यांनी स्वतःच्या प्रतिष्टेपायी अनावश्यक खर्च केला.
एका गावात साधारणत: १२ किंवा १५ पेक्षा अधिक मतदार नाहीत. मात्र तरीही विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराप्रमाणे गावागावात प्रचाररथ फिरताना दिसले. इथे तेवढ्या मर्यादित मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन ,फोनवरून संपर्क करून भागवता आले असते मात्र हवा दिसावी यासाठी नेत्यांना अनाठायी खर्च करावा वाटला. कमी संख्येत असलेल्या मतदारांना सहज भेटून प्रचार यंत्रणा राबविण्याऐवजी आपलीच हवा दिसावी या मोहात काही नेते पडले. काही गावांमध्ये १५ - १५ बोकड कापून मतदारांची मटणाची सोय करण्यात आल्याचेही समजते. मंचावर शेतकरी हिताच्या गप्पा मारणारे नेतेही भाषणानंतर पार्ट्या झोडतांना दिसले. पैशातून सत्ता मिळवायची, त्या सत्तेतून पैसा आणा सत्तेतून मिळालेल्या पैशातून पुन्हा पुन्हा सत्ता मिळवायची या चक्रातून लोकशाहीची सुटका होईल का?