विधान परिषदेचे आमदार..? हं हं हंऽऽ प्रतापराव जाधव!... नाही नाही संजय गायकवाड!!
बुलडाण्यातील केंद्रावर मतदानासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींना सध्याचे विधान परिषदेचे आमदार कोण हेही सांगता आले नाही. एका नगरसेविकेने संजय गायकवाड, नंतर प्रतापराव जाधवांचे नाव सांगून टाकले. बुलडाण्यातील तहसील कार्यालयात सिंदखेड राजाहून मतदानासाठी आलेल्या एका लोकप्रतिनिधीने मला नाय माहीत... म्हणून काढता पाय घेतला... अशीच चमत्कारिक उत्तरे अन्य लोकप्रतिनिधींकडूनही मिळाली. बोटावर मोजण्याइतक्या लोकप्रतिनिधींनी योग्य उत्तर दिले.
विधान परिषदेच्या अकोला- बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, नगरपंचायतीचे सदस्य या निवडणुकीसाठी मतदान करत असतात. मात्र मतदान करणाऱ्या लोकप्रतिधींना विधान परिषद निवडणूक ही फक्त लक्ष्मीदर्शनापुरतीच माहीत असल्याचे त्यांच्या अज्ञानामुळे समोर येत आहे. पाच वर्षांतून एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांचे हे प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करतात.