विधान परिषद निवडणूक... बुलडाण्यात ११ मतदान केंद्र!

 
voting
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषदेच्या अकोला- बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ जिल्ह्यांत मिळून यंदा २२ मतदान केंद्र राहणार आहेत. तिन्ही जिल्ह्यांतून प्राप्त अहवालाअंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या २२ केंद्रांच्या प्रस्तावाला आयोगाने मान्यता दिली.
येत्या १० डिसेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी जय्यत प्रशासकीय तयारी करण्यात येत आहे. मतदान केंद्राचे निर्धारण हा त्याचा एक भाग ठरावा. एकूण ८२१ मतदार असलेल्या या मतदारसंघात महिलांचे निर्णायक म्हणजे ४३२ मतदान असून, पुरुष मतदार ३८९ इतके आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३६८ मतदार असल्याने केंद्रांची संख्याही सर्वाधिक म्हणजे ११ इतकी आहे. संग्रामपूर व मोताळा वगळता इतर ११ तालुक्यांत ही केंद्रे कार्यान्वित राहणार आहेत. अकोला जिल्ह्यातील २८५ मतदारांसाठी ७ तर वाशिम जिल्ह्यातील १६८ मतदारांसाठी ४ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान पार पडणार आहे. १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.