विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी बुलडाण्यात स्पष्टच सांगितलं! म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीत,पण बुलडाणा लोकसभेच्या जागेवर अधिकार आमचाच;

विकासकामांवरूनही मारला टोला, बुलडाण्यात प्रोजेक्ट होत नाही अन् पाईपलाईन होते म्हणाले...

 
Danve
बुलडाणा( अभिषेक वरपे;बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा आधीपासून शिवसेनेचा गड आहे. तो परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ आहे.  इथे आम्ही आतापर्यंत विजय मिळवत आलो आहोत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील शिवसेनेचा खासदार निवडून आला होता. त्यामुळे आम्ही जरी महाविकास आघाडीत असलो आणि सर्वांना जागा मागण्याचा अधिकार असला तरी बुलडाणा लोकसभेच्या जागेवर पहिला अधिकार आमचाच आहे असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. जनता दरबाराच्या निमित्ताने आज, १७ जानेवारीला ते बुलडाण्यात आले असता कार्यक्रमाआधी त्यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला,यावेळी ते बोलत होते. जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यावेळी उपस्थित होते.

 यावेळी बुलडाणा लोकसभेच्या उमेदवारीबद्दल पत्रकारांनी विचारले असता त्याबद्दलचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे अंबादास दानवे म्हणाले. राज्य सरकारच्या धोरणांवर देखील त्यांनी टीकास्त्र सोडले. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून किती लोकांना फायदा झाला? कार्यक्रमाचे रेकॉर्ड काढा, माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे असे ते म्हणाले. बुलडाण्यात प्रोजेक्ट होत नाही पण पाईपलाईन होते असा टोलाही त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव न घेता लगावला.