संग्रामपुरात आघाडी; मोताळ्यात बिघाडी! 26 जागांसाठी 95 उमेदवार आखाड्यात!!
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही ठिकाणच्या ओबीसींसाठी राखीव चार चार जागा वगळून प्रत्येकी 13 जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या धामधुमीत चिखलीमध्ये पार पडलेल्या बैठकीत नगरपंचायत निवडणुका आघाडी करून लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीला खा. प्रतापराव जाधव, आमदारद्वय संजय रायमूलकर, संजय गायकवाड, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, जालिंदर बुधवत, नाझेर काझी आदी आघाडीवीर हजर होते.
मात्र संग्रामपूरमध्ये आघाडी झाली असताना मोताळ्यात या घोषणेला सुरंग लागला! तिथे काँग्रेस व शिवसेना एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. रिंगणात दोन्ही पक्षांचे मिळून 26 उमेदवार लढत असले तरी अप्रत्यक्षपणे मोताळ्यातील ही निवडणूक हर्षवर्धन सपकाळ व संजय गायकवाड या दोन माजी- आजी आमदारांमधील राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर 9 जागा लढवत आहे. वंचितने 7 जागा लढविण्याची हिंमत दाखविली असताना भाजपा केवळ 4 जागा लढवत आहे. मुख्य लढत काँग्रेस व सेनेमध्ये दिसत असली तरी बहुतेक ठिकाणी इतर पक्षांमुळे बहुरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.
संग्रामपुरात आघाडी विरुद्ध भाजपा
दरम्यान, संग्रामपूरमध्ये आघाडी व भाजपामध्ये मुख्य लढत होत आहे. याशिवाय मागील कालावधीतील सत्ताधारी वंचित, प्रहार व संग्रामपूर मित्र परिवार युती मैदानात उतरली आहे. यामुळे आणि भावी जि.प., पं.स. निवडणुकीची रंगीततलीम असल्याने यंदाची लढत चुरशीची ठरली आहे. 13 जागांसाठी 46 उमेदवार मैदानात उतरले आहेत. मात्र सर्वपक्षीय मोठे नेते लढाईवर बारीक लक्ष ठेवून आहेत.