खंडेलवाल यांचा बाजोरियांना दे धक्का!; विधानपरिषदेत कमळ फुलले!!
अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सुसज्ज नियोजन केल्याने, निकालाला किमान 5 तास लागतील या अंदाजालाही धक्का लागला! यामुळे आता कोणती फेरी? अशी विचारणा सुरू असताना लढतीचा निकालाच हाती आला!! यामुळे मतमोजणीसुद्धा सुखद धक्का देणारी ठरली. तसेच या मतदारसंघात प्रथमच मिळविलेला अन् तोही 109 मतांच्या दणदणीत फरकाने मिळविलेला विजय भाजप व खंडेलवाल समर्थकांसाठी सुखद धक्का तर बाजोरियासाठी दुःखद धक्का ठरला! आघाडीसाठी हा धक्का असला तरी अनेक नेते व सदस्यांनी क्रॉस वोटिंग करून आघाडीला धक्का दिलाय! बाजोरियांना केवळ 334 मते मिळाली. याचाच अर्थ म्हणजे आघाडीची तब्बल 62 मते फुटली. यामुळे ही निवडणूक म्हणजे धक्के पे धक्का अशीच ठरली.
...आणि अवैध धक्का!
दरम्यान, या निकालात तब्बल 31 मते अवैध ठरणे हा मोठा धक्काच म्हणावा लागेल. मतमोजणीच्या पहिल्या व पाचव्या टेबलवर प्रत्येकी 7, दुसऱ्या व तिसऱ्या टेबलवर प्रत्येकी 8, तर चौथ्या टेबलवर 1 अशी मते रद्द ठरली. या 31 महाभागांनी घेण्याचे काम चोख केले पण (मत) देण्याचे काम मात्र चोख केले नाही. हा उमेदवारांना दिलेला 31 व्होल्टचा सौम्य धक्काच ठरावा! यातील काहींनी पहिल्या क्रमांकाची पसंती लिहिली नाही वा डबल लाभामुळे दोघांना पहिल्या पसंतीची मते दिली.
तसेच काहींनी मतपत्रिकेवरील रकान्यात एक आकड्यात न लिहिता अक्षरात लिहिला तर काहींनी प्रूफच्या नादात पत्रिकेवर सही, सूचक चिन्ह लिहिली असावी. यामुळे त्यांची मते वैध ठरली. आता या 31 जणांनी कुणाला धक्का दिला हे गुलदस्त्यातच राहणार आहे. मात्र ही मते वैध असती तर कदाचित खंडेलवाल यांचा लीड वाढला असता किंवा बाजोरिया यांचा कमी झाला असता. हा धक्का मोठा मजेदारच ठरावा असाच आहे. त्यापूर्वी आज, 14 डिसेंबरला सकाळी 8 वाजता अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोडावूनमध्ये मत मोजणी पार पडली. झटपट निकालानंतर भाजपा कार्यकर्ते व चाहत्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.
बुलडाणा लाइव्हने काल निवडणुकीचा 'निकाल'च अप्रत्यक्षरित्या जाहीर केला...तोच अगदीच तंतोतंत खरा ठरला आहे.