खा.प्रतापराव जाधवांना खामगाव आणि जळगाव जामोदने भरभरून दिलं! होमग्राउंड मेहकरात जेमतेम लीड!सिंदखेराजा विधानसभेत रविकांत तुपकरांना २९९७९ मतांची लीड पण घाटाखाली खूप मागे पडले..!

आमदार गायवाडांच्या बुलडाणा आणि श्वेताताईंच्या चिखलीत नरेंद्र खेडेकरांना लीड! वाचा कुठल्या मतदारसंघात कोण ठरलंय हिरो...

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रतापराव गणपतराव जाधवांनी बाजी मारली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांना हा निकाल धक्का देणारा ठरला. २ लाख मताधिक्याने आपण निवडून येऊ अशी भाषा करणारे प्रा.नरेंद्र खेडेकर मतमोजणीत एकदाही आघाडीवर आले नाही. खेडेकरांना आणि त्यांच्या समर्थकांना विजयाचा एवढा विश्वास होता की निकालाआधीच त्यांनी माध्यमांना शुभेच्छा जाहिराती दिल्या होत्या.पण ३ वेळेस सलग ३ वेळेस विधानसभा आणि ३ वेळेस लोकसभा जिंकणाऱ्या खा.जाधव यांनी सलग सातव्या निवडणुकीत विजयाची परंपरा कायम ठेवत आपणच "बॉस" असल्याचे दाखवून दिले. या निवडणुकीत नेहमीप्रमाणे खा.प्रतापराव जाधव यांना घाटाखालील खामगाव आणि जळगाव जामोद या मतदारसंघाने प्रचंड मताधिक्य दिले, एवढे की त्या आधारावरच ते विजेते ठरले. होमग्राउंड असलेल्या मेहकर विधानसभेत त्यांची नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्याशी टाईट फाईट झाली शेवटी २४३ मतांची निसटती आघाडी मिळवली. मेहकर विधानसभेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले तुपकर नरेंद्र खेडेकर यांच्यापेक्षा केवळ ७९ मतांनी मागे होते. प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर यांच्यात मेहकर विधानसभेत केवळ ३२२ मतांचे अंतर राहिले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाने रविकांत तुपकर यांना भरभरून आशीर्वाद दिले. तुपकर यांनी सिंदखेडराजा विधानसभेत तब्बल ७४ हजार ७५३ मते घेत प्रतापराव जाधव यांच्यावर २९ हजार ९८९ मतांची आघाडी घेतली. मात्र रविकांत तुपकर खामगाव आणि जळगाव जामोद मध्ये खूप मागे पडले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातही रविकांत तुपकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. संजय गायकवाड आणि आमदार श्वेताताई महाले यांच्या मतदारसंघात नरेंद्र खेडेकर पहिल्या क्रमांकावर राहिले.
आमदार गायकवाड आणि आमदार श्वेताताईंच्या मतदारसंघात खेडेकर आघाडीवर..
 बुलडाणा विधानसभेत खा.प्रतापराव जाधव यांना ४७ हजार ४०२, नरेंद्र खेडेकर यांना ४९ हजार ६६५ तर रविकांत तुपकर यांना ३८ हजार ८६४ मते मिळाली. खेडेकर यांना बुलडाणा विधानसभा मतदारसंघात २ हजार २५५ मतांची आघाडी मिळाली. चिखली विधानसभा मतदारसंघात खा. जाधव यांना ४९ हजार २४४, नरेंद्र खेडेकर यांना ६१ हजार १४४ तर रविकांत तुपकर यांना ४४ हजार ५१५ मते मिळाली. आमदार श्वेताताई महालेंच्या या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या खेडेकरांनी ११ हजार ९२० मतांनी आघाडी मिळवली.
   सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांनी ७४ हजार ७५३, प्रतापराव जाधव यांनी ४४ हजार ७६४ तर नरेंद्र खेडेकर यांना ३६ हजार २६६ मते मिळाली. आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे खा. जाधव यांना आघाडी मिळवून देण्यात कमी पडले, या मतदारसंघात रविकांत तुपकर यांना २९ हजार ९२९ मतांची आघाडी मिळाली. मेहकर विधानसभा खा.जाधव ५६ हजार १४, नरेंद्र खेडेकर यांना ५५ हजार ७४१ तर रविकांत तुपकर यांना ५५ हजार ६६२ मते मिळाली. या मतदारसंघात खा.जाधव यांना २४३ मतांची निसटती आघाडी मिळाली.
   खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाने खा.प्रतापराव जाधव यांना भरभरून दिले. खामगाव विधानसभा मतदारसंघात प्रतापराव जाधव यांना ७५ हजार ३८२ नरेंद्र खेडेकर यांना ५५ हजार ९६ तर रविकांत तुपकर यांना २० हजार ९९७ मते मिळाली. खामगाव विधानसभेत खा.जाधव यांना २० हजार २८६ मतांची निर्णायक आघाडी मिळाली. तर जळगाव जामोद विधानसभेत खा.जाधव यांना ७५४८३, नरेंद्र खेडेकर यांना ६१४९१ तर रविकांत तुपकर यांना १४२४१ मते मिळाली. जळगाव जामोद विधानसभेतून खा.जाधव यांना १३ हजार ९९२ मतांची आघाडी मिळाली. घाटाखालच्या खामगाव आणि जळगाव जामोद मतदारसंघाने खा. जाधव यांना ३४ हजार २७८ मतांची निर्णायक आणि विजयी आघाडी दिली आणि पुन्हा एकदा प्रतापराव गणपतराव जाधव खासदार झाले..