कास्तकार बंधुंनो १ रुपया प्रिमियम भरून पिकविमा काढा! आमदार श्वेताताईंचे आवाहन; म्हणाल्या महायुती सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासणारे ​​​​​​​

 
mla sweta tai

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील महायुती सरकारने नैसर्गिक आपत्तीपासून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमध्ये शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये महत्त्वाचा क्रांतिकारी असा बदल केलेला आहे. त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपया प्रीमियम भरून आपला पिक विमा काढता येणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या तरतुदीचा चिखली मतदार संघातील प्रत्येक शेतकन्यांनी फायदा घ्यावा आणि केवळ एक रुपया प्रीमियम भरून आपल्या पिकविमा काढावा असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले आहे..

पूर, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ आदि नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच रोगराईमुळे वेळोवेळी शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान होत असते. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिकविमा योजना चालवली जाते. या पिकविमा योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने यावर्षी क्रांतिकारी बदल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून केवळ एक रुपया प्रीमियम भरून शेतकऱ्यांना आपल्या पिकविमा काढता येणार आहे. महायुती सरकारने केलेल्या या सुधारणेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि चिखली मतदारसंघातील प्रत्येक कास्तकाराने आपला पिक विमा अवश्य काढावा असे आवाहन आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केले आहे. 

सीएससी सेंटर चालकाला शासन देणार पैसे 

 पिक विम्याचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरतांना प्रत्येक सीएससी सेंटर चालकांना शासनाकडून विहित रक्कम अदा करण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिक विम्याचा अर्ज ऑनलाईन सादर करतांना कोणत्याही सीएससी सेंटर चालकाला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची आवश्यकता नाही. तसेच पिक विमा काढताना कुठल्याही मध्यस्थाला किंवा इतरांना अतिरिक्त पैसे देण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्टीकरण आ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.